जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना जिल्हा परिषद आरोग्य विभाग सेवा देण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांनी दिले आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी जिल्हा परिषद स्वतंत्र ३०० बेड उपलब्ध करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. तसेच पूर्ण जिल्ह्यात १२०० बेड उपलब्ध करण्याचे नियोजन सुरु आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
कुडाळ तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता प्राधान्याने एग्रीकल्चर कॉलेज, होमगार्ड भवन, वुमन्स कॉलेज येथे तसेच बॅरिस्टर नाथ पै आणि अणाव नर्सिंग असे मिळून कुडाळ तालुक्यात तीनशे बेडचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कुडाळ तालुक्यातील कोविड सेंटरची यादी व उपलब्ध बेडची संख्या ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्षा संजना सामंत यांनी दिली. याबाबतचे पूर्ण नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांच्या देखरेखीखाली झालेले आहे.
जिल्ह्यातील उर्वरित तालुकानिहाय जिल्हा परिषद आरोग्य विभाग माध्यमातून अशाच प्रकारचे नियोजन करून १२०० अतिरिक्त बेड उपलब्ध करून ठेवणार असल्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाने निश्चित केलेले आहे. यामध्ये करोना बाधित रुग्णांना दाखल करून घेणे तसेच त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांमार्फत देखरेख ठेवणे, नियमित तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे ऑक्सिजन सुविधा, आवश्यक असल्यास तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जेणेकरून रुग्णांवर योग्य उपचार होतील व या आजारातून लवकर बाहेर येण्यास मदत होईल. याबाबत कुडाळ तालुक्यातील खाजगी डॉक्टरांनादेखिल विनंती केली होती. ती मान्य करून त्यांनीही आपली सेवा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे.
जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना विनंती आहे, की आपल्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या तापाच्या रुग्णांना आपल्या नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रेफर करावे. जेणेकरून संशयित रुग्णांची कोरोना टेस्ट करून त्यांच्यावर उपचार करणे सहज शक्य होईल. तसेच रुग्णांमध्ये दिसणारे सिंप्टंस पाहूनच त्याची आरोग्य यंत्रणा कडून आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. कारण सरसकट सर्वांची टेस्ट केल्यास उपलब्ध किटची क्षमता पाहता किटचा तुटवडा जाणवू शकतो. खरोखरच सिंप्टंस असणाऱ्या व्यक्तींना हे किट प्राधान्याने वापरावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षांनी केले आहे.
तसेच ज्या गावात, वाड्यांत, वस्त्यांमध्ये किंवा घरामध्ये दहापेक्षा अधिक संशयित रुग्ण असल्यास संबंधित व्यक्तीने किंवा त्यांच्या कुटुंबियांनी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. जेणेकरून त्यांच्या ठिकाणापर्यंत मोबाईल ॲम्बुलन्स सेवा पथक पाठवून संशयित रुग्णांची कोरोना टेस्ट घेता येईल. त्यामुळे संबंधित कुटुंबाला टेस्टिंगसाठी प्रवास करावा लागणार नाही. तसेच तातडीने टेस्ट घेतल्याने रिपोर्ट पण लवकर घेऊन उपचार करणे देखील सोपे होणार आहे. यामुळे करोना रुग्णांचे निदान लवकर झाल्यामुळे पुढील प्रसार देखिल रोखता येणार आहे. तरी संशयित रुग्ण किंवा कुटुंबीयांनी या मोबाईल टेस्ट कलेक्शन युनिटचा लाभ घ्यावा व कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्षा संजना सावंत यांनी केले आहे.