(चिपळूण)
वाशिष्ठी डेअरीतर्फे आयोजित कोकणातील पहिल्या कृषी महोत्सवाला ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या कृषी प्रदर्शनात महिला बचत गट व कृषी उत्पादनांच्या स्टॉलला मोठा प्रतिसाद लाभत असून, पशू प्रदर्शन प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले आहे.
शहरातील बहादूरशेख चौकाजवळ सावरकर मैदानावर हा महोत्सव भरला असून वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, चिपळूण नागरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, संस्थापक-अध्यक्ष सुभाष चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव भरविण्यात आला आहे. जिल्हावासीयांनी या महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला आहे.
सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, आ. शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन झाले. शुक्रवारी सायंकाळी या प्रदर्शनाला शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली तर शनिवारी (दि.६) दिवसभर प्रदर्शनाला ग्रामीण, शहरी भागातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने भेट देत होते. जिल्हाभरातून अनेक लोक प्रदर्शन पाहण्यासाठी येत होते. या शिवाय चिपळूण परिसरातील शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सहली प्रदर्शनाला भेट देत होत्या.
या प्रदर्शनातील दीड कोटीचा गजेंद्र रेडा, आठ फूट शिंग असलेली पंढरपुरी म्हैस, उंच घोडे, लक्ष्या बैल, कपिला गाय, आझोल गाय, पक्षी, प्राणी, खेकडा संवर्धन यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी लोक गर्दी करीत होते. नाचणारे घोडे या प्रदर्शनात खास आकर्षण होते. या शिवाय गजेंद्र रेडा मोठी गर्दी खेचत होता. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या स्टॉलला मोठी गर्दी होती. या ठिकाणी खेकडा संवर्धन कीट लोकांचे आकर्षण ठरले. संपूर्ण दिवसभर प्रदर्शनाला मोठी गर्दी लाभली. या ठिकाणी विविध स्पर्धा घेण्यात आल्या आणि शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रेही झाली.