(चिपळूण)
चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान संपन्न होणाऱ्या पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सवाच्या लोककला कट्ट्यात आपली कला सादर करण्यासाठी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जिल्हयातील लोककलावंतांनी ३० जानेवारी २०२३ पर्यंत आयोजकांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा महोत्सव श्रीजुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदान येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवात अनेक लोककला आणि लोकपरंपरा यांचे सादरीकरण होणार आहे. गेले सहा महिने महोत्सवाची तयारी सुरू असून याअंतर्गत कोकणातील पारंपरिक गीतांची स्पर्धाही घेण्यात येत आहे. प्रत्यक्ष महोत्सवात पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक लोककला आणि लोककलावंत यांना मुख्य सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सलग चार रात्री हा कार्यक्रम रंगणार आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लोककला आणि लोककलावंत यांच्यासाठी ६ व ७ फेब्रुवारी या दोन दिवशी सायंकाळी चार ते सहा या वेळात ‘लोककट्टा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात लोककलांचे सादरीकरण करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक लोककलावंतांना आवाहन करण्यात येत आहे. या लोककट्यासाठी कलाप्रकार पारंपरिक असावा. तो पारंपारिक पद्धतीने सादर करण्यात यावा. वैयक्तिक वा सांघिक पद्धतीतील लोककला लोककट्ट्यावर सादर करण्यासाठी पाच मिनिटे ते पंधरा मिनिटे वेळ दिला जाईल. जिल्ह्यातील नमन, भारुड, जाखडी, गोमू, काटखेळ, संकासूर, भजन, डेरा, कव्वाली, गज्जो, कातकरी, आदिवासी, मुस्लीम वा इतर धर्मीय पारंपारिक लोकगीते, उखाणे, ओवी, भलोरी, लग्नगीते, बारसा गीते वा अन्य प्रकारची विधीगीते सादरीकरण करण्याची संधी दिली जाणार आहे. सर्व सहभागी कलाकारांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह दिले जाईल. लोककलेच्या संदर्भग्रंथात यातील उत्कृष्ट लोककलांचा समावेश करण्याचे आयोजकांच्या विचाराधीन आहे.
ज्या लोककलावंतांना लोककट्ट्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी लोककट्टा प्रमुख राष्ट्रपाल सावंत मो. ९४०३१४४३५६, स्नेहा ओतारी मो. ९६६५०४५८२९, महम्मद झारे मो. ९९७००८९४०६, कैसर देसाई मो. ९८२२१२२१०८, अमिता टिकेकर मो. ९४०५५९५२४९ येथे संपर्क साधावा.