(जालना)
बीडसह राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. काही जाळपोळींच्या घटनाही घडल्या आहेत. याची झळ आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब आणि संदीप क्षीरसागर यांना बसली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले की, मी मराठा समाजाला साखळी उपोषण आणि आमरण उपोषण करण्यास सांगितले होते. मराठा समाज जे सांगेल ते काम मी करत आहे. मराठा समाजाचे आंदोलन शांतते सुरू असताना हे कोण करत आहे, ही शंका येते आहे. जाळपोळ करणारे बहुतेक सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते असल्याचा संशय आहे. बहुतेक सत्ताधाऱ्यांची लोक जाणून बुजून त्यांचीच घरे, त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून जाळून घेऊ लागलेत, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी काल उशिरा राजभवनावर दाखल झाले होते. दोघांमध्ये आरक्षणाबाबत चर्चा झाल्याचे समजते. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटलेले आहे. राज्यात मराठा आंदोलक हिंसक मार्गाने आंदोलने करीत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा काल सहावा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर फडणवीसांसोबत वर्षा बंगल्यावर चर्चा केली. बीडमधील काही राजकीय नेत्यांची कार्यालय-घरे जाळल्याच्याही घटना घडल्या आहेत. यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यातील जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची बैठक घेणार आहेत. तसेच काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी होणार लागू होण्याची शक्यता आहे.
बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी याबाबत आदेश जाहीर केले आहेत. आंदोलकांनी बीडमध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यालयांना आगी लावल्या. आंदोलकानी आमदार प्रकाश सोळंके, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांची घरे पेटवल्यानंतर अग्निशमन दलाची गाडी देखील जाळली. अशाच अनेक जाळपोळीच्या घटना येथे घडत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येथे संचारबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर बीडमधील इंटरनेट सेवा 1 नोव्हेंबर पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी कितीही धिंगाणा घातला तरी आपण उपोषण थांबवणार नाही. मराठा समाजाने शांत रहावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. ते म्हणाले की, सर्वाना माझी हात जोडून विनंती, आज रात्री आणि उद्या दिवसा कुठेही जाळपोळ कानावर येऊ देऊ नका. आंदोलन शांततेत सुरू आहे, ते पूर्ण करायचे आहे. आपण कुणाच्याही दारात जायायचे नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, बीडमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना समोर आली. त्यानंतर आता बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ‘राष्ट्रवादी भवन’ पेटवून दिले असल्याची घटना समोर आली आहे. त्याशिवाय, मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यलयाच्या जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची आज भेट घेणार
कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्यासह सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आज मंगळवारी (दि.३१) आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजेच आंतरवाली सराटी गावाकडे रवाना होणार आहेत. ते मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या उपोषणाच्या ठिकाणी जाणार आहेत. तेथे जाऊन कोल्हापूरचे शाहू महाराज या आंदोलनाला पाठींबा देणार आहेत. त्यांच्यासोबत वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, बाबा पार्टे, हर्षल सुर्वे, बाबा देसाई आदी जाणार आहेत.