(मुंबई)
राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरीवरून झालेल्या आरोपांना उत्तर देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केली. याबाबतीत सत्ताधारी भाजप व शिंदे गटानं उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र पुढं आणलं होतं. बारसू येथील रिफायनरीच्या प्रस्तावाबाबत दिलेले हे पत्र होतं. ‘बारसूमध्ये रिफायनरी उभारण्यासाठी मी पत्र दिलं होतं, पण लोकांची टाळकी फोडून रिफायनरी उभी करा असं आमच्या सरकारचं धोरण नव्हतं. लोकांना काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. बारसूबद्दलची माझी भूमिका ही तिथल्या लोकांची भूमिका, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
‘प्रकल्पांबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. पर्यावरणाचा विनाश करणारा प्रकल्प आम्हाला नको आहे. नाणारच्या रिफायनरीलाही आम्ही याच कारणावरून विरोध केला होता. तेथील लोकांनी आम्हाला त्यांची बाजू सांगून तशी विनंती केली होती. त्यानंतरच आम्ही त्या प्रकल्पाच्या विरोधात उतरलो होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडं निरोप येऊ लागले. रिफायनरीसाठी आग्रह धरला जाऊ लागला. हा चांगला प्रकल्प आहे. इतर ठिकाणीही रिफायनरी होतायत. शुद्धीकरण प्रकल्प, एवढ्या लोकांना रोजगार मिळेल, असं मला सांगितलं गेलं. त्यानंतर मी विचार करून प्राथमिक अहवाल मागवला. ज्या ठिकाणी रिफायनरीचं स्वागत होत असेल तिथं जरूर न्या, अशी माझी भूमिका होती. चर्चेअंती बारसूची जागा समोर आली. तिथं जागा मोकळी असून काही लोकांनी मंजुरी दिल्याचं कळलं. त्यानंतर सरकार गेलं. मात्र, सरकार जात असतानाच केंद्राकडून बारसूच्या रिफायनरीसाठी ग्रीन सिग्नल आला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रशासनानं लोकांसमोर जावं, तिथं खरे सादरीकरण करावं. लोकांना प्रश्न विचारू द्यावे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी. त्यातून दोघांना मान्य असेल प्रकल्प करा, असं आमच्या सरकारचं धोरण होतं. तुम्ही पारदर्शकतेबद्दल बोलता मग हे केलेच पाहिजे. लोकांच्या हिताची गोष्ट त्यांच्या टाळक्यात मारून का सांगताय? भल्याचं असेल तरीही त्याच्यासाठी जोरजबरदस्ती करण्याची वेळ का यावी?, असा रोकडा सवाल उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने केला आहे.