(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मूळचे मालगुंड गावचे सुपुत्र असलेले प्रसिद्ध रांगोळीकार राहुल कळंबटे यांनी गणेशोत्सवाच्या काळात काढलेल्या थ्रीडी रांगोळी ची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली. गणपती मूर्तीची पांढऱ्या टाईल्सवर थ्रीडी रांगोळी साकारून त्यांनी वर्ल्ड रेकॉर्डस ऑफ एक्सलन्स या विक्रमावर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर जगातील सर्वात छोटी थ्रीडी रांगोळीची अशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.
या दैदिप्यमान जागतिक स्तरावरील यशाची विशेष दखल घेऊन आणि संपूर्ण मालगुंडवासियांसाठी अभिमानास्पद ठरलेली कामगिरी लक्षात घेऊन राहुल कळंबटे यांचा मालगुंड ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या एका खास विशेष ग्रामसभेमध्ये मालगुंड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच श्वेता खेऊर यांच्या हस्ते राहुल कळंबटे यांचा व त्यांच्या भरीव यशात योगदान देणाऱ्या मातोश्रीचा सन्मान करण्यात आला. यावेळी मालगुंडचे उपसरपंच संतोष चौगुले, ग्राम विकास अधिकारी नाथाभाऊ पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी तसेच मालगुंडवासिय ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालगुंडच्या इतिहासात सोनेरी सुवर्ण अक्षराने सोनेरी नोंद करता येईल अशा स्वरूपाची चमकदार कामगिरी राहूल कळंबटे यांनी करून संपूर्ण मालगुंड गावाचे नाव जगाच्या नकाशावर रोशन केले आहे. त्यामुळे मालगुंड वासियांसाठी जागतिक पातळीवरील ही एक मोठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब ठरली आहे. राहुल कळंबटे यांच्या या विशेष कामगिरीची छाप सर्वत्र उमटत असताना त्यांच्या यशात आणखी भर पडावी आणि त्यांचे मनोबल आणखी वाढावे व उत्तरोत्तर रांगोळी कलेतील कामगिरी उंचावण्यासाठी शाबासकीची थाप म्हणून आपण राहुल कळंबटे यांचा मालगुंड ग्रामपंचायतीच्या वतीने यथोचित सन्मान केल्याची प्रतिक्रिया मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर यांनी दिली.