दापोली : आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आपल्या आई, बहीण, पत्नी, मुलगी, मैत्रिण, शिक्षिका इत्यादींप्रती आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा गौरव, सन्मान करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, ६ मार्च २०२२ रोजी सायकल फेरी काढण्यात आली. दापोलीच्या जडण घडणीमध्ये महत्वाचे योगदान दिलेल्या अनेक आदरणीय महिला या सायकल फेरीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
या सायकल फेरीचा मार्ग आझाद मैदान दापोली- केळसकर नाका- बुरोंडी नाका- पटवर्धन हॉस्पिटल- गिम्हवणे गणेश मंदिर- गोडबोले आळी- मेहेंदळे आळी- उगवत वाडी- जाखमाता मंदिर- दत्त मंदिर- गिम्हवणे ग्रामपंचायत- गणेश नगर- आझाद मैदान असा ८ किमीचा होता. या मार्गावर काही महिलांचा सन्मान करण्यात आला तसेच ठिकठिकाणी सायकल फेरीचे खाऊ, चिक्की, कॅडबरी, पाणी, सरबत देऊन स्वागत केले गेले. दापोली नगर पंचायत येथे महिला आणि बाल कल्याण सभापती साधना बोथरे, योग शिक्षिका वैष्णवी देवरुखकर, नीलम तलाठी, विनिता शिगवण आणि इतर महिला योगसाधक तसेच या मार्गावर राहत असलेल्या समाजसेविका अनुप्रिता फडके, स्मिता सदानंद जोशी, शिक्षिका अश्विनी कर्वे, ग्रामसेविका ज्योती फाटक, पक्षीप्रेमी अपर्णा पित्रे, नेहमी सायकलने प्रवास करणाऱ्या ग्रंथपाल राखी मेहेंदळे, शिक्षिका निता शिरवणेकर, उद्योजिका तनम गांधी, प्रतिष्ठा प्रसाद भांबुरे, सुप्रिया रिसबूड, फॅशन डिझायनर योगिता केळसकर, उगवतवाडी येथे महिला ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य निधी लवरे, शिगवण, पटवर्धन हॉस्पिटल व फडके हॉस्पिटल येथील नर्स, डॉक्टर, कर्मचारी, दापोली पोलीस स्टेशन पीएसआय शितल पाटील आणि महिला कर्मचारी, ऑल इंडिया क्रॉस कंट्री रनिंग स्पर्धेत सलग तीन वर्षे सहभागी होऊन दापोलीचे नाव क्रीडा क्षेत्रात उंचावणाऱ्या शिल्पा केंबळे, स्नेहा भाटकर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही महिलांचा गौरव करण्यात आला, समाजासाठी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. अनेक महिलांनी सायकल फेरीमध्ये सहभाग घेऊन सोबत सायकल पण चालवली. यातील बहुतेक सर्वांनीच लहानपणी खूप सायकल चालवली होती आणि आता पुन्हा सायकल चालवायला सुरवात करणार असे ठामपणे सांगितले.
जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरुषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले आहे. दापोलीतील महिलाही मागे नाहीत, येथे नगराध्यक्ष, तहसीलदार, सभापती, नगरसेविका, सरपंच, सदस्य इत्यादी अनेक पदे महिला प्रभावीपणे सांभाळत आहेत. येथे अनेक महिला कृषी, वैद्यकीय, शासकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्व महिलांप्रती दापोलीकरांना आदर आणि अभिमान आहे.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्यपणे सायकल फेरीचे आयोजन केले जाते. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात सुनिल रिसबूड, केतन पालवणकर, अंबरीश गुरव, उत्तम पाटील, विनय गोलांबडे, पराग केळसकर, रोहन कदम, राकेश झगडे, सुरज शेठ, झाहीद दादरकर, संदेश चव्हाण, अमोद बुटाला इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !