(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड जोशीवाडी येथील श्री चंडिका जाखडी नृत्य कलापथकाचा पन्नासावा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी शुक्रवारी संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये कोकणची लोककला असलेला शक्ती -तुरा जाखडी नृत्याचा सामना रसिक प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरला.
मालगुंड जोशीवाडी येथील श्री चंडिका जाखडी नृत्य कलापथकाने आपल्या जाखडी नृत्याची पन्नास वर्षे पूर्ण करून संपूर्ण रत्नागिरी तालुक्यात आपले नावलौकिक प्राप्त केले.त्यामुळे आपल्या कलापथकाची प्रेरणा इतर कलापथकांना घेता यावी तसेच इतर कलापथकातील नव्या शाहिरांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहित करता यावे, या मूळ उद्देशाने चंडिका जाखडी नृत्य कलापथकाने आपला पन्नासावा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न करण्याचे नेटके आयोजन आयोजन केले होते.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मालगुंड-गणपतीपुळे पोलीस क्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी, पोलीस नाईक कीर, पत्रकार संदीप खानविलकर, धामणसेचे माजी उपसरपंच अशोक सांबरे, तुकाराम सांबरे आदींसह विविध ठिकणचे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री चंडिका जाखडी नृत्य कलापथकाचे प्रमुख शाहिर सुनील लोगडे यांचे चिरंजीव समर्थ सुनील लोगडे याचा 15 सप्टेंबर हा चौथा वाढदिवस मालगुंड जोशीवाडी येथील श्री चंडिका जाखडी नृत्य कलापथकाच्या वतीने मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गोड पदार्थ असलेला केक कापून समर्थ चा वाढदिवस मोठ्या जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात आला.
मालगुंड -गणपतीपुळे पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिस उपनिरीक्षक क्रांती पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप साळवी आदींसह अन्य प्रतिष्ठित मान्यवर, चंडिका जाखडी नृत्य कलापथकाचे पदाधिकारी व सदस्य तसेच विविध ठिकणचे शाहिर, मित्रमंडळी, सुनील लोगडे यांचे नातेवाईक व जोशीवाडी येथील स्थानिक ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समर्थ लोगडे याला चौथ्या वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.यानंतर श्री चंडिका जाखडी नृत्य कलापथकाच्यावतीने मालगुंड दशक्रोशीतील नामवंत शाहिर व जाखडी नृत्य कलापथकांचा यथोचित सन्मान आपल्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.त्यानंतर रात्रीच्या सत्रात कोकणची लोककला असलेला शक्ती -तुरा जाखडी नृत्याचा जंगी सामना वेतोशी वरचीवाडी येथील श्री भैरी भवानी जाखडी नृत्य कलापथकाचे शक्तीवाले शाहीर रोहित माचिवले व दिपराज रांबाडे यांचे विरुद्ध मालगुंड जोशीवाडी येथील तुरेवाले शाहीर सुनील लोगडे व वसंत फडकले यांचे शिष्य शाहीर निलेश भातडे यांच्यात रंगला.
हा सामना पाहायला मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लाभली होती.यावेळी विविध प्रबोधनात्मक गाण्यांच्या आधारावर रंगलेला जंगी सामना रसिका प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरला.यावेळी शक्तीवाले शाहिर रोहित माचिवले व दिपराज रांबाडे यांना कीबोर्ड पंकज घाणेकर, प्रशांत कदम बॅन्जो मास्टर दर्शन पाटील, ढोलकी मयुरेश घवाळी, राहुल गावडे, ऑक्टपॅड राजन कळंबटे या वाद्यरुद्धांची विशेष साथ लाभली .तर तुरेवाले शाहीर निलेश भातडे यांना कीबोर्ड सुनील वेदरे, ढोलकी नाना घवाळी,बेंजो मास्टर समीर मालप, भावेश मालप यांचे वाद्यवृंद सहकार्य लाभले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालगुंड जोशीवाडी येथील श्री चंडिका जाखडी कलापथकाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताराम उर्फ बाबा आग्रे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली मुख्य शाहीर सुनील लोगडे, वसंत फडकले कार्याध्यक्ष तथा नवोदित शाहीर निलेश भातडे, संजय दुर्गवळी, नितीन भातडे, उदय हुमणे, विनोद हुमणे,सत्यम हुमणे, सुशांत हुमणे, महेश फडकले, आवा दुर्गवळी,आदित्य आग्रे, रमेश भातडे आदींसह अन्य सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.