(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव हिरामण वाघमारे हे २९ वर्षाच्या तर याच विद्यालयातील वरिष्ठ लिपीक यशवंत विश्राम चव्हाण हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. या दोघांचा यथोचित सत्कार मालगुंड एज्युकेशन सोसायटी व मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांच्या वतीने शाल, श्रीफळ, बुके व प्रेमाची भेटवस्तू देऊन करण्यात आला.
सदरचा सत्कार समारंभ शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव व बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनिअर कॉलेजचे सीईओ विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, संचालक व तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाचे सीईओ किशोर पाटील, यांसह शिक्षण संस्थेचे सल्लागार, निमंत्रित संचालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी,माजी कर्मचारी, सत्कारमूर्तींचे नातलग, मित्रमंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री नामदेव वाघमारे यांनी या शिक्षण संस्थेच्या जाकादेवी व मालगुंड या विद्यालयात २९ वर्षापेक्षा जास्त काळ अध्यापनाचे प्रामाणिक आणि उत्तम काम केले.यामध्ये त्यांनी १८ महिने मुख्याध्यापक पद सांभाळले.तर वरिष्ठ लिपीक श्री. यशवंत चव्हाण यांनी लांजा तालुक्यातील प्रतापराव माने माध्यमिक विद्यालय व सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय जावडे या हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सुमारे ३४ वर्ष लिपीक पदावर तर जाकादेवी विद्यालयात २ वर्ष मिळून ३६ वर्ष अतिशय प्रामाणिक आणि निष्ठेने लिपीक पदाचे काम केले.
वरिष्ठ लिपीक यशवंत चव्हाण यांनी शिक्षण संस्थेत व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना लांजा -राजापूर तालुक्यातून विविध सामाजिक संस्थांनी आदर्श लिपीक म्हणून पुरस्कार त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या दोन्ही मान्यवरांची मालगुंड शिक्षण संस्थेने दखल घेऊन मुख्याध्यापक नामदेव वाघमारे आणि वरिष्ठ लिपीक यशवंत चव्हाण भाऊसाहेब यांचा शाळा, ज्युनिअर कॉलेज, शिक्षण संस्था व शिक्षण संस्थेच्या विविध शाखांच्यावतीने तसेच नातलग व मित्रमंडळ, हितचिंतक यांच्याकडून दोन्ही सत्कार मूर्तींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सत्काराबद्दल सत्कारमूर्ती नामदेव वाघमारे आणि यशवंत चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून शाळा व संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक शाम महाकाळ यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी केले, तर आभार अरुण कांबळे यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, मुख्याध्यापक, शाळांचे प्रतिनिधी, नातेवाईक यांनी दोन्ही सत्कार मूर्तींची गुणवैशिष्ट्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.