(जाकादेवी/ संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कनिष्ठ महाविद्यालयातील विशेष गरजा असणाऱ्या ३८ विद्यार्थ्यांना पंचायत समिती रत्नागिरी यांच्याकडून दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर कंदील, पणत्या, उटणे, टाकावू पासून टिकाऊ वस्तू अशा विविध वस्तू तयार करण्याचे कौशल्यात्मक प्रशिक्षण देण्यात आले.
सदरचे प्रशिक्षण पंचायत समिती रत्नागिरी येथील गटशिक्षणाधिकारी श्रीम.प्रेरणा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्याचे कृती प्रशिक्षण विषय तज्ज्ञ सौ.अश्विनी मयेकर, विषयतज्ज्ञ वंदना गुरव, विशेष शिक्षक नंदू कांबळे यांनी अतिशय आवडीने दाखवून विद्यार्थ्यांकडून विविध वस्तू तयार करून घेतल्या.
अशी प्रशिक्षणं तालुक्यातील फणसोप केंद्रासह खेडशी, नगरपालिका, शिवाजी हायस्कूल,जाकादेवी हायस्कूल इ. मुख्य शाळांतून देण्यात आली. विशेष गरजा असलेल्या दिव्यांग मुले आणि त्यांचे पालक यांच्या समवेत हे प्रशिक्षण देण्यात आल्याने हे प्रशिक्षण खूपच प्रेरक ठरले.
त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये विविध वस्तू तयार करण्याचे कौशल्य प्राप्त झाले. हा उपक्रम राबविण्यासाठी यामध्ये विषयतज्ज्ञ आणि विषय शिक्षक यांचा समावेश होता. प्रामुख्याने, आश्विनी मयेकर, वंदना गुरव, मेघा इंगळे, शर्मिष्ठा वायंगणकर, तृप्ती शिरगावकर, नंदू कांबळे आदींनी विशेष मेहनत घेतली.
जाकादेवी विद्यालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले. प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक भूपाल शेंडगे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार कलाध्यापक तुकाराम दरवजकर, अमित बोले, शाम महाकाळ, शिवानंद गुरव, मंदार रसाळ, संदेश सोनवडकर, सौ.निला कुराडे इतर सर्व शिक्षक उपस्थित होते.
विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या मानसिकता लक्षात घेऊन त्यांना कौशल्यवान वस्तू तयार करण्याचे साध्या सोप्या पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. मुलांना व मुलांच्या पालकांना सविस्तर मार्गदर्शन अश्विनी मयेकर यांनी केले.
यावेळी विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांची जुनी सर्टिफिकेट अपडेट करण्यासंदर्भात नंदू कांबळे, अश्विनी मयेकर यांनी शिक्षक व पालकांना मार्गदर्शक सूचना दिल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी पंचायत समितीचा समावेशित विभाग अधिक मेहनत घेत आहे.