(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुण्यस्मरण दिन संयुक्त कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी प्रमुख वक्ते महेश राडे यांनी क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांचे वैज्ञानिक व परिवर्तनवादी विचार स्पष्ट करून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन करून बहुमोल मार्गदर्शन केले. तर प्रमुख वक्त्या सौ. वैष्णवी साळुंके यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण शिक्षण व देशासाठी केलेले महान कार्य विविध प्रसंगातून स्पष्ट करून विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे सर्वव्यापी कार्य विशद केले.
अध्यक्षीय विचारातून बिपीन परकर यांनी महामानवांच्या आदर्श प्रसंगातून आपण चांगला बोध घेऊन आपण जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करावी आणि चांगले विचार अनुसरण्याचे आवाहन केले. यावेळी कवी अरुण कांबळे यांनी महामानवास हे स्वरचित प्रभावी काव्य सादर केले.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांना मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक भूपाल शेंडगे यांनी पुष्पहार अर्पण केले. स्वागत शिवानंद गुरव यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी केले. या कार्यक्रमात निवडक १० विद्यार्थ्यांनी भाषणे व काव्यवाचन केले. शेवटी आभार अमित बोले यांनी मानले.