(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे जाकादेवी चाफे वळणावर मोठमोठे खड्डे पडले असून चढ उताऱ्याच्या वळणावरच हे खड्डे पडल्याने रात्री मोटरसायकल व छोट्या गाड्यांच्या अपघात वाढ झाली आहे, पण अपघातग्रस्त कोणाकडे दाद मागणार? डोळेझाक करणाऱ्या लोकप्रतिनिधींकडे? की प्रशासनाकडे ? फार मोठी गंभीर स्थिती निवळी-जयगड रस्त्याची झाली आहे. अक्षरश: काही भागात पाण्याचे डोह तयार झाले आहेत.
तरी प्रशासनाने या खड्ड्याकडे दुर्लक्ष न करता या रस्त्यावरील पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत अशी आग्रही मागणी ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे. केवळ चाफे परिसरातील नाही तर निवळी ते जाकादेवी जयगड मार्गावर पडलेले खड्डे लवकर बुजवले गेले नाहीत, तर जन- आंदोलनासाठीची तयारी देखील तालुक्यातील पक्ष विरहित असलेल्या युवकांनी आणि तरूण वर्गाने केली असल्याचे विल्ये परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते अमरशेठ देसाई, राईचे सामाजिक कार्यकर्ते राजेश सावंत, जाकादेवीतील युवा नेते प्रतिक देसाई, बंटी सुर्वे, कळझोंडी गावचे सामाजिक कार्यकर्ते किशोर पवार, संदीप पवार यांनी खात्रीशीर सांगितले. रास्ता रोको आंदोलन छेडण्यावर भर असून निवेदनावर सह्यांची मोहिम सुरू करण्यात आली आहे.