जयंत पाटील हे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या बंगल्याचे पहारेकरी आहेत का, असा घणाघाती हल्ला करीत, भाजपाचे माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घर व कार्यालयाची झडती घेतली. या संदर्भात जयंत पाटील यांनी सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा आरोप केला आहे. पाटलांच्या या आरोपाचा राणे यांनी समाचार घेतला.
जयंत पाटील हे देशमुख यांच्या बंगल्याचे पहारेकरी आहेत का, ज्यांचा बंगला आहे, जे त्या बंगल्यात राहतात, ते आरोप करीत नाही व ज्यांचा घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करीत आहेत. घरात कोण जाते व कोण येते, हे पहारेकर्याशिवाय कोण सांगू शकतो, त्यामुळे पाटील यांना ही माहिती असल्याने कदाचित ते देशमुखांच्या बंगल्याचे पहारेकरी असावे, असा टोला राणे यांनी हाणला. जयंत पाटलांनी डोक्याचा वापर करून बोलावे. तुम्हाला हे शोभत नाही, असे सांगतानाच परमबीरसिंह यांना त्यावेळी मांडीवर घेऊन बसला होता. आता ते खलनायक झाले आहेत काय, असा सवालही त्यांनी केला.
राकाँमध्ये इतकी अस्वस्थता का?
देशमुखांची चौकशी व्हावी, हे न्यायालयाला वाटले. त्यामुळेच न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यात महाविकास आघाडीच्या पोटात दुखायचे कारण काय, तुमचे हात साफ असतील तर सुटाल, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इतकी अस्वस्थता का वाढली आहे, हेच कळत नाही. उद्या आपलेही नाव येईल म्हणून पक्षाचे नेते बिथरले आहेत. चौकशी झाली तर कुठपर्यंत नावे जातील, याची त्यांना भीती वाटते, असा दावाही त्यांनी केला.
अनिल परब यांचीही चौकशी व्हावी
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार करीत, ते देखील या गुन्ह्यात भागीदार आहेत. उद्धव ठाकरेंना पैसे पोहोचविण्याचे काम परब करीत होते. ते सुटू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.
…..त्याशिवाय राऊतांना पगार मिळत नाही
राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊतांवरही टीका केली. राऊतांना केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केल्याशिवाय पगार मिळत नाही. राऊतांविरोधात एका महिलेने तक्रार केली आहे. अनेक महिन्यांपासून ही महिला न्याय मागत आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.