(मुंबई)
शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत नुकताच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्यात आला आहे. तर आता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जन्मभूमी भगूर येथे लवकरच वीर सावरकरांचे म्युझियम उभारण्याचा संकल्प शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आला आहे. भगूर ही नाशिक जिल्ह्यातील एक नगरपरिषद आहे. भगूर हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे.
२६ फेब्रुवारीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त या म्युझियमबाबत घोषणा राज्य सरकारच्या पर्यटन विभागातर्फे करण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे हे म्युझियम उभारण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. भगूर या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्म निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात आले असून ते पाहण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळही आहे. त्यात स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित अनेक रचना आणि स्वातंत्र्य चळवळीचे अनेक संस्मरणीय फोटो आहेत.
भगूर येथे प्रस्तावित असलेल्या थीम पार्कसोबतच आता वीर सावरकरांचे म्युझियम उभारण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. भगूरमधील म्युन्सिपल गार्डन येथे हे म्युझियम उभारण्यात येणार आहे. याची घोषणा येत्या २६ फेब्रुवारीला करण्यात येणार आहे. भगूर येथे पर्यटन विभागामार्फत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माहिती देताना सांगितले.