(देवरूख / सुरेश सप्रे)
गेली अनेक वर्षे विविध संघटनांनी आंदोलने करूनही संगमेश्वर रेल्वे स्थानकात जनशताब्दी, नेत्रावती आणि मत्स्यगंधा या जलद गाड्यांना अद्यापही थांबा मिळालेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रेल्वे स्थानक हे प्रमुख गजबजलेलं रेल्वे स्थानक आहे. नोकरीनिमित्त सुमारे २ लाख चाकरमानी मुंबई- ठाणे पनवेल- विरार पर्यंत ये-जा करत असतात. सदर गाड्या फक्त चिपळूण, रत्नागिरी येथेच थांबतात त्यामुळे संगमेश्वर परिसरातील प्रवाशांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. उन्हाळी, गणपती आणि होळी (शिमगा) या सणांना चाकरमानी प्रवासी संख्या जास्त असूनही दक्षिणेकडील राज्यांना प्राधान्य दिले जात आहे.
सदर संगमेश्वर प्रवाशांवर सतत होणारा अन्याय दूर करून न्याय देण्यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून नुकतेच स्थापन झालेल्या मराठा फाउंडेशन तर्फे अध्यक्ष गणेश खामकर आणि पद्मश्री गजानन माने यांच्या उपस्थितीत कोकण रेल्वेचे चेअरमन तथा मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर सुमारे कोरोना काळापासून अद्याप रत्नागिरी- दादर ही रेल्वे पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच जात आहे. सदर गाडी पूर्ववत दादर स्थानकापर्यंत सुरू करण्यात यावी व रेल्वे प्रवाशांचा मानसिक आर्थिक त्रास कमी होईल अशी विनंती मराठा फाउंडेशन तर्फे रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली.
भावी पिढ्यांना कोकण रेल्वेचे शिल्पकार कोण.?याची माहिती असणेसाठी कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात आणणारे कोकण रेल्वेचे शिल्पकार सर्वश्री कै. बॅरिस्टर नाथ पै, माजी रेल्वेमंत्री मधु दंडवते, श्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावाचे फलक रत्नागिरी आणि चिपळूण रेल्वे परिसरात लावण्याची मागणी करण्यात आली.