(देवरूख / सुरेश सप्रे)
राज्यातील विद्यमान सरकार हे अकार्यक्षम असल्याने सामान्य लोकांना दररोज भेडसावणा-या प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगमेश्वर तालुका राष्ट्रवादीकाँग्रेस (शरद पवार गट) याचे वतीने तहसिलदार देवरूख यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात युवा, विदयार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक सरकारच्या अकार्यक्षम कारभारामुळे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळया अडचणींना सामोरं जावं लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी शासनकर्ते अपयशी ठरले आहे. त्याकडे लक्ष वेधावे म्हणून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहीती विधानसभा क्षेत्र प्रमुख दत्ताराम लिंगायत व युवा नेते निलेश भुवड यांनी दिली.
कापूस, सोयाबीन, कांदा, तूर या शेतमलाला भाव नाही, अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकाचं नुकसान होऊनही विम्याची नुकसान भरपाई मिळत नाही. नोकर भरतीसाठी हजार हजार रुपये शुल्क आकारुनही होत असलेली पेपरफुटी ही तर नेहमीचीच बाब झाली आहे. यामुळे प्रामाणिक विदयार्थ्यावर आणि बेरोजगारांवर अन्याय होत आहे. राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीच, पण महाराष्ट्राच्या वाटयाचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यांत आणि त्यातही प्रामुख्याने गुजरातमध्ये नेले जात आहेत. कामानिमित्त घराबाहेर पडणा-या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करुनही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आंदोलनाकडं सरकार ढुंकूनही बघत नाही. दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत, पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही. यावर सरकारने ठोस निर्णय घेवून पिचलेल्या सामान्यांना न्याय द्यावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात येत आहे, असे दत्ताराम लिंगायत व निलेश भुवड यांनी बोलताना स्पष्ट केले.
राज्यातील युवक हा आपल्या देशाचा कणा आणि भविष्य असून एकूण लोकसंख्येमध्ये त्याचं प्रमाण 60 टक्के आहे. तरीही त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने राज्यातील युवा वर्ग अस्वस्थ आहेत. राज्यात 32 लाख युवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून परीक्षा फी, पेपरफुटी, रखडलेली अडीच लाख रिक्त पदांची भरती हे प्रश्नही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. या सर्वाना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाढती महागाई. बेरोजगारी. व अन्य समस्यांकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात असल्याने या सरकारला जाग यावी म्हणुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दत्ताराम लिंगायत, निलेश भुवड, मोहन वनकर, बाबा सावंत, राष्ट्रवादीच्या तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा दिपीका किर्वे, अल्ताफ जेठी, अयुब कापडी, उल्हास नलावडे, रामदास शिगवण आदी पदाधिकारी उपस्थित होते