(फुणगूस / एजाज पटेल)
कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याची बदली हा त्याच्या जीवनातील अविभाज्य भागच असते. तो सरकारी अधिकारी आहे म्हणजे त्याची बदली ही होणारच, परंतु ज्या भागात तो काम करतो त्या भागासाठी केलेल्या कामाच्या जोरावर तो अधिकारी जनतेच्या गळ्यातील ताईत बनतो. असाच एक दबंग अधिकारी म्हणजे संगमेश्वर पोलीस ठाण्याचे बदली झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुरेश ठाकूर गावित. तालुक्यात प्रथमच अशा एका अधिकाऱ्यांच्या बदलीने अनेकांच्या नयनात आपसूकच अश्रू आले.
संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली झाली आहे. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहरातील व कार्यक्षेत्र गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी सेवा कालावधीत केलेले काम, राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना, त्यांची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक या सारख्या बऱ्याच गोष्टींचा उल्लेख करत त्यांनी कर्मचाऱ्यांसह जनतेच्या हृदयात एकप्रकारे वेगळेच स्थान निर्माण केल्याचे सांगितले. अशा या जिगरबाज आणि दबंग पोलीस अधिकाऱ्याचा निरोप समारंभ चर्चेचा विषय ठरत आहे.
एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमास झालेली गर्दी पाहता असा निरोप समारंभ संगमेश्वरमध्ये प्रथमच झाला असावा, असे वाटते. अशा एका जिगरबाज पोलीस निरीक्षकला निरोप देताना सहकारी पोलीस आणि तालुकावासीयांनी दिलेल्या प्रेमळ निरोपामुळे पोलीस निरीक्षक सुरेश गावित हे सुद्धा भारावले.
तालुक्यातील आपली शेवटची भेट घेत असताना अनेक ग्रामस्थ भावूक झाले होते. पोलीस कर्मचाऱ्यांसह उपस्थितांनीही साहेब तुमची व तुमच्या कार्याची खूप आठवण येईल अशा भावना देखील व्यक्त करताना काहींचे डोळे पाणावले होते. पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांना अनेकांनी शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टीचा वर्षाव करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी निरोप घेताना पो.नी.सुरेश गावित यांनी सहकारी पोलिसांसह उपस्थित संगमेश्वरवासीयांचे मनोभावे आभार मानले.