(मुंबई)
देशासह जगात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक स्तरावर ५० कोटी व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहेत. पुढच्या ३० वर्षांत प्रत्येक देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. ही संख्या दुप्पट होऊन १.३ अब्जापर्यंत पोहोचू शकते, असा दावा लॅन्सेट संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनात करण्यात आला आहे. जगभरात मधुमेहाचा प्रसार ६.१ टक्के दराने होत आहे. मधुमेह हे मृत्यू आणि अपंगत्वाच्या असलेल्या १० कारणांपैकी एक आहे.
जागतिक पातळीवर एकूण मधुमेहींमध्ये ९६ टक्के टाईप २ प्रकारच्या मधुमेहाचे आहेत, असे संशोधकांनी म्हटले आहे. यासाठी ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज २०२१’ या अभ्यासाचा आधार संशोधकांनी घेतला आहे. मधुमेहामुळे होणाऱ्या सहव्याधी, मधुमेहामुळे होणारे मृत्यू यांचा २०४ देशांमधील वेगवेगळ्या वय आणि लिंगाच्या व्यक्तींचे सर्वेक्षण करून हा अभ्यास करण्यात आला होता.
मधुमेहाचे प्रमाण प्रामुख्याने ६५ वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठांमध्ये जास्त आहे. जगभरात ज्येष्ठांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सरासरी २० टक्के आहे. त्यात उत्तर आफ्रिका आणि आखाती देशांत हे प्रमाण ३९.४ टक्के आहे. मध्य युरोप, पूर्व युरोप आणि मध्य आशियामध्ये हे प्रमाण १९.८ टक्के आहे. इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशनच्या माहितीनुसार, जगात मधुमेहाचे २०२१ मध्ये ५२.९ कोटी रुग्ण होते आणि त्याच वर्षी मधुमेहामुळे ६७ लाख जणांचा मृत्यू झाला. मधुमेहाची लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे, वैद्यकीय तपासणी करणे आणि उपचार घेणे हे या आजाराविरूद्धच्या महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक उपायांपैकी एक आहे.