(मुंबई)
जगभरात प्रसिद्ध असलेली आणि पाश्चात्य देशांना कडवी स्पर्धा देणारी देशी औषध कंपनी सिप्ला लवकरच इंग्रजांच्या हाती जाणार असल्याचे बोलले जात आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी फार्मा कंपनी असलेल्या सिप्लाचे १.२ लाख कोटींची मार्केट कॅप आहे. मात्र आता ही कंपनी विकली जाणार आहे. जगातील सर्वात मोठी इक्विटी फर्म ब्लॅकस्टोन ही कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. सिप्ला कंपनीच्या भविष्यातील नेतृत्वासाठी कोणीही नसल्याने कंपनी विकली जाण्याची चर्चा आहे.
सिप्ला ही देशातील सर्वात जुनी औषध कंपनी आहे, जी नफ्यापेक्षा औषधाची किंमत कमी ठेवण्यावर भर देते. या कंपनीला गरिबांची औषध कंपनीही म्हटले जाते. या कंपनी स्वातंत्र्यापूर्वी म्हणजेच १९३५ मध्ये सुरू झाली होती. या कंपनीचा व्यवहार ब्लॅकस्टोनशी झाला, तर या कंपनीची धुरा भारतीयाच्या हातातून निघून परदेशी व्यक्तीच्या हातात जाईल.
ख्वाजा अब्दुल हमीद त्यांच्या मृत्यूनंतर कंपनीची धुरा युसूफ हमीद यांच्याकडे सोपवण्यात आली. युसूफ हमीद हे ८७ वर्षांचे आहेत. युसूफ हमीद (अध्यक्ष) आणि एमके हमीद (उपाध्यक्ष) दोघेही दुसऱ्या पिढीतील आहेत आणि दोघेही जुने आहेत. या कारणास्तव २०१५ मध्ये त्यांनी सिप्लाच्या संचालक मंडळावर आपली भाची समीना हमील यांचा समावेश केला. समिना हमीद या हमीद कुटुंबाची तिसरी पिढी आहे आणि सध्या त्या कंपनी सांभाळत आहेत.
समीना या कंपनीच्या कार्यकारी उपाध्यक्षा आहेत. समीना हमीद या कुटुंबातील तिसर्या पिढीतील एकमेव सदस्य आहेत, ज्या कंपनी सांभाळत आहेत. म्हणजेच कंपनी सांभाळणारे या कुटुंबात दुसरे कोणी नाही. अशा परिस्थिती सिप्ला कंपनीच्या नेतृत्वासाठी स्पष्ट रोडमॅपची गरज हमीद कुटुंबाला वाटते. मात्र सिप्ला कंपनीच्या नेतृत्वाचा प्रश्न अनेक दिवसांपासून चिंतेचा विषय आहे. कंपनीला नेतृत्व मिळावे यासाठी हमीद कुटुंब कंपनीतील त्यांचे संपूर्ण हिस्सेदारी विकण्याचा विचार करत आहे. ही बातमी समोर आल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार होत आहेत. दरम्यान, ब्लॅकस्टोनने एलपी (लिमिटेड पार्टनर) सोबत सिप्लामधील संपूर्ण हिस्सा विकत घेण्यासाठी नॉन-बाइंडिंग बोली लावली आहे. असे असले तरी अद्यापही कंपनी विकली गेलेली नाही.
भारतात जेनेरिक औषधांची सुरुवात सिप्लानेच केली होती. पुढे 1972 मध्ये सिप्लाने हृदयरोगावरील उपचारासाठी Propranolo या औषधाचे जेनेरिक व्हर्जन तयार केले. सिप्लाच्या या दाव्यानंतर इंपीरियल केमिकल इंडस्ट्रीज या ब्रिटीश कंपनीने त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. यानंतर युसूफ हमीद यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. ते इंदिरा गांधी यांना म्हणाले, कोट्यवधी भारतीयांना जीवनरक्षक औषध मिळू नये का? कारण आपल्या लोकांना ते औषध बनवणारे आवडत नाहीत”, असे विचारले. यानंतर भारत सरकारने पेटंट कायद्यात बदल केला. सिप्लाच्या या पावलामुळे देशात स्वस्त आणि जेनेरिक औषधांचा मार्ग खुला झाला.