(रत्नागिरी)
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या सुरू असलेल्या रूग्णवाहिका सेवा उपक्रमाला आता एक तप पूर्ण झाले आहे. गेल्या 12 वर्षांत संस्थानच्या 27 रुग्णवाहिकांनी महामार्गावरील 8642 अपघातस्थळी जाऊन 17416 जणांना तातडीने इस्पितळात पोहोचवले आहे. त्यातून जखमीवर वेळेत उपचार सुरू होऊन त्यांचे प्राण वाचण्यास मोठी मदत झाली आहे.
संस्थानच्या अनेक सामाजिक उपक्रमांपैकी मोफत रुग्णवाहिका सेवा हा महत्वपूर्ण उपक्रम आहे. महामार्गांवरील अपघातग्रस्थांच्या मदतीसाठी त्या धावत आहेत. सध्या मुंबई- गोवा, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-सोलापूर-हैदराबाद, मुंबई-आग्रा, पुणे-बंगलोर, रत्नागिरी-नागपूर अशा सहा महामार्गावर महाराष्ट्राच्या हद्दीत वेगवेगळ्या गावी संस्थानच्या 27 रूग्णवाहिका सध्या कार्यरत आहेत. सतत 24 तास त्या दक्ष असतात. तेथून त्या महामार्गाच्या टापूतील दोन्ही बाजूच्या 25-30 किलो मीटर परिसरातील अपघाताची लगेच दखल घेतात. जखमींना तातडीने दवाखान्यात पोहोचवतात. त्यातून एक तपाच्या कालावधीत एवढे मोठे सामाजिक काम संस्थानने केले आहे.
अशाप्रकारची मोफत रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्तांना उपयुक्त ठरेल अशी कल्पना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांना सुचली. आपल्या सततच्या दौर्यात त्यांच्या संवेदनशील मनाला जाणवले की वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. रस्ते अपुरे पडत आहेत. वाहनांचा वेग देखील अधिक वाढतो आहे. त्यामुळे सतत अपघात होत असतात. त्याची दखल लोक तातडीने घेत नाहीत. शेजारून वाहने धावत असतात पण अपघाताकडे वा तेथील जखमींकडे ते ढुंकूनदेखील बघत नाही. त्यामुळे अनेक जखमी जाग्यावरच विव्हळत असतात. अनेकांना केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागतात. यावरून स्वामीजींना रुग्णवाहिका सेवेची कल्पना सुचली.
एक-दोन करीत संस्थानच्या आज एकूण 27 रुग्णवाहिका कार्यरत आहेत. कोणीही अपघाताबाबत संपर्क साधला की त्या अपघातस्थळी धाव घेतात. जखमींना रुग्णवाहिकेत घेतात व जवळच्या सरकारी प्राथमिक उपचारकेंद्रात त्यांना तातडीने दाखल करतात. जर रुग्ण गंभीर असेल तर त्याला जिल्हा रुग्णालयात देखील हलवले जाते.
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेची सुरूवात झाली. 25 जुलै 2010 पासून झाली. सुरुवातील मुंबई-गोवा महामार्गावर त्या सुरू करण्यात आल्या. त्याला मिळणारा प्रतिसाद, त्याची उपयोगिता व उपयुक्तता लक्षात घेऊन वेळोवेळी वाढ करण्यात आली. आज अशा 27 रुग्णवाहिका समाजसेवेचा वसा घेऊन धावत आहेत. जखमींचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत आहेत. गेले एक तप हे कार्य अखंड चालू आहे.
या सेवेमुळे रुग्णांवरती तातडीने उपचार सुरू होतात. त्यांचे प्राण वाचण्यास मदत होते. त्यामुळे या रुग्णवाहिका अपघातग‘स्तांसाठी जीवनवाहिन्या बनलेल्या आहेत. शिवाय महत्वाचे म्हणजे यासाठी रुग्णांकडून वा त्यांच्या नातेवाईकांकडून कसलेही पैसे घेतले जात नाहीत.
मुंबई -गोवा महामार्गावर कशेडी घाट, संगमेश्वर, हातखंबा, राजापूर येथे रुग्णवाहिका आहेत. त्यांनी 1770 अपघातस्थळी जाऊन 4250 जखमींना रुग्णालयात पोहोचवले. मुंबई-आग्रा महामार्गावर कसारा घाट, गोंदे फाटा, शिरवडे फाटा व मालेगाव येथील रुग्णवाहिकांनी 2639 अपघात अटेंड करून 5475 जखमींना रुग्णालयात पोहोचवले. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिरसाड, तलसारी येथील रुग्णवाहिकांनी 1413 अपघातस्थळी धावून 2699 जखमींना रुग्णलायत दाखल केले आहे. मुंबई-सोलापूर-हैदराबाद महामार्गावर यवत, इभगवण, इंदापूर, नळदुर्ग, उमरगा अशा पाच ठिकाणी रुग्णवाहिका आहेत.
त्यांनी 1401अपघातस्थळी जाऊन 2866 जखमींना रुग्णालयात नेले. पुणे-बंगलोर महामार्गावर कापूरहोळ, पारगाव खंडाळा, लिंब फाटा, मसूरफाटा, वाघवाडी, वाठार अशा सहा ठिकाणी रुग्णवाहिका आहेत. त्यांनी 1345 अपघातस्थळी जाऊन 1978 जखमींना रुग्णालयात दाखल केले. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर नाणीज, बांबवडे, सांगोला, मंगळवेढा अशा चार ठिकांणी रुग्णवाहिका आहेत. त्यांनी 74 अपघातस्थळी जाऊन 148 जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. अशातर्हेने 27 रुग्णवाहिकांनी 8642 अपघातस्थळी धावून जाऊन 17,416 जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
अशा तर्हेने ही सेवा व्यापकप्रमाणात लोकांना उपयोगी पडत आहे. आज त्याचे महत्व एवढे वाढले आहे की अपघात झाला की लोकच रुग्णवाहिकांच्या चालकाला फोन करतात. पोलिसांना देखील ही सेवा उपयोगी पडत आहे. त्यामुळे ते वेळोवेळी अपघाताची माहिती देतात. ही रुग्णसेवा 24 तास उपलब्ध आहे. रात्री, अपरात्री कोणत्याहीवेळी रुग्णवाहिका अपघातस्थळी धावत असते. काही चालकांनी दरीतून जखमींना वरती आणून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे लोक या सेवेबद्दल संस्थानला दुवा देत असतात. अनेक जखमी रुग्ण व त्यांचे नातेवाईक नंतर स्वामीजींना पत्र पाठवून आभार मानत असतात.