(नाणीज)
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा २१ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमानीं साजरा होत आहे. या दिवशी संस्थानतर्फे सात रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याची जोरदार तयारी सुंदरगडावर सुरू आहे.
दरवर्षी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव त्यांच्या भाविकांतर्फे, उत्साहात साजरा केला जातो. यंदा तो २१ ऑक्टोबर रोजी आहे. त्यानिमित्त देशाच्या कानाकोपर्यातून सुंदरगडावर लाखो भाविक येत असतात. दिवसभर अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते. त्यांच्या अमृतमय प्रवचनाने सोहळ्याचा समारोप होत असतो. यावेळी त्यांच्या वाढदिवसांनिमित्त आणखी सात रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
संस्थानच्या अनेक उपक्रमांपैकी अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार सुरू करण्यासाठी त्यांना रुग्णवाहिकांतून रुग्णालयात पोहोचवण्याचा हा उपक्रमआहे. ही सेवा पूर्णतःविनामूल्य आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांनी प्रवासादरम्यान अनेक अपघात पाहिले. अपघातील जखमींना कोणी विचारत नाही. तो जाग्यावरच विव्हळत असतो. कोणते वाहन थांबत नाही, अशी मानसिकता आहे. त्यातून रुग्णवाहिकांचा असा उपक्रम राबविण्याचे त्यांनी ठरवले.
संस्थानने महाराष्ट्राच्या हद्दीतील सर्व महामार्गावर अशा रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. आता ती एकूण रुग्णवाहिकांची संख्या संख्या ४९ होणार आहे. सर्व महामार्गावर प्रत्येक २५ ते ३० किलोमीटर एक रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच त्या तातडीने अपघातस्थळी जातात. जखमींना जवळच्या रुग्णालयात, आवश्यकता भासल्यास जिल्हा रुग्णालयात पोहोचवतात. त्यामुळे जखमींवर तातडीने उपचार चालू होऊन त्यांचे प्राण वाचण्यास मदत होते.
संस्थानच्या या उपक्रमाची मोठी चर्चा आहे. या रुग्णवाहिकांनी आत्तापर्यंत अशा २० हजारांवर अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यात मदत केली आहे. एकूण उपक्रमाचे महत्व लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या आणखी वाढविण्यात येत आहे.
दरम्यान, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसाची तयारी सुंदरगडावर जोरात सुरू आहे. या दिवशी अनेक धार्मिक कार्यक्रम असणार आहेत. यावेळी नाशिक, परभणी व मुंबई येथून ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देत वसुंधरा दिंड्या निघाल्या आहेत. त्या जन्मोत्सवदिनी नाणीज येथे २१ ऑक्टोबरला सुंदरगडावर पोहोचणार आहेत.