दिवाळी आदी सणांसाठी केल्या जाणारा गोड पदार्थापैकी सर्वांच्या आवडीचा असा हा शंकरपाळी पदार्थ. सण नसेल तरीही, एरवी जाता येता तोंडात टाकायला, चहा सोबत खायला किंवा प्रवासात न्यायला अतिशय सोपा व खुसखुशीत पदार्थ म्हणजे शंकरपाळे. हा पदार्थ कोरडा असल्याने प्रवासात न्यायला ही चांगला वाटतो, सोयीचा वाटतो, आणि बिस्किटाला पर्यायी असा हा पदार्थ आहे .आणि हा करायला सोपा व न बिघडणारा आहे. फक्त यातले सामान टाकताना योग्य मापाने टाकले तर शंकरपाळी कधीच बिघडणार नाहीत. तर मग पाहूया खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी.
साहित्य
१) तुप १ वाटी
२) साखर १ वाटी
३) दुध १ वाटी
४) मैदा ४ ते ५ वाटी
५) तळण्यासाठी तेल
६) पाव चमचा मीठ
शंकरपाळ्याचे साहित्य मोजताना एकच वाटी वापरा आणि त्याच वाटीने सर्व सामान घ्या.म्हणजे प्रमाण अचूक राहील. वाटी छोटी किंवा मोठी तुम्ही ठरवा.
स्टेप १
एका पातेल्यात दूध व साखर विरघळण्यासाठी गॅसवर ठेवा. दुधामध्ये पूर्ण साखर विरघळली की गॅस बंद करा. नंतर हे मिश्रण एका ताटात ओता. याच ताटात आपण शंकरपाळ्याचा उंडा तयार करणार आहोत. आता याच पातेल्यात एक वाटी तूप गॅसवर पातळ करण्यासाठी ठेवावे. ते चांगले कडकडीत तापले की दूध साखरेच्या मिश्रणात ओतावे. हे तूप दुध व साखरेमध्ये मिसळले नाही. कारण की त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण सेपरेट तूप पातळ करून टाकणार आहोत.
स्टेप २
ताटातील मिश्रण गरम आहे तोपर्यंतच त्यात चाळून घेतलेला मैदा थोडा थोडा करून मिसळत जावा. हळुवारपणे हाताने गोल गोल फेटत हा उंडा तयार करायचा आहे.जास्त दाबून कणीक तींबल्यासारखे करायचे नाही. सुरुवातीला चार वाट्याच मैदा मिसळा. खूपच पीठ पातळ वाटत आहे असे वाटले तर राहिलेले एक वाटी पीठ मिसळा. या मैद्यामध्ये थोडेसे मीठ घालायला विसरू नका.आपण असा हळुवारपणे उंडा चोळल्यामुळे शंकरपाळेला छान लेयर येतात.
आता हा तयार झालेला उंडा एक ते दोन तासासाठी झाकून ठेवावा. शंकरपाळी लाटताना उंडा पूर्णपणे थंड झालेला असावा.
स्टेप ३
शंकरपाळे च्या तयार केलेल्या उंड्यातून मोठ्या पोळी एवढा उंडा बाहेर काढून घ्यावा.व तो पोळपाटावर तूप लावून लाटून घ्यावा. लाटून घेत असताना पीठ अजिबात वापरू नये.तसेच शंकरपाळ्याची पोळी जास्त जाड किंवा जास्त पातळ नसावी.मध्यम आकाराची पोळी तयार करा. व सुरीने याचे आडवे व उभे असे शंकरपाळ्या चे काप तयार करा.असे सर्व काप तयार करून एका ताटामध्ये काढून घ्या. काप एकाला एक चिकटले तरी काही घाबरायचे कारण नाही.तेलात सोडल्यानंतर ते आपोआप विलग होतात. तेलात सोडताना तुम्ही ते एकत्र सोडले तरी चालतात.
स्टेप ४
गॅसवर जाड बुडाची कढई ठेवून तेल तापण्यास ठेवावे.तेल चांगले तापले की थोडेसे शंकरपाळे घेऊन तेलात सोडावे.गॅस मंद असावा.मंद गॅसवर शंकरपाळी गुलाबी रंगाची होईपर्यंत तळून घ्यावी. असे सर्व शंकरपाळे तळूण झाल्यानंतर गॅस बंद करावा.
थंड होईपर्यंत एका ताटामध्ये शंकरपाळी ठेवावेत.व थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट डब्यात भरून ठेवावी.
शंकरपाळी तळताना घाई करू नये मंद आचेवर खालीवर करत शंकरपाळी तळून घ्यावीत.
टीप
शंकरपाळ्यामध्ये सोडा घालायची अजिबात गरज नाही. कारण आपण कडकडीत तूप घातल्यामुळे शंकरपाळे खुसखुशीत होतात.