(रत्नागिरी)
छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये 15 जून रोजी पर्यावरण पूरक पद्धतीने प्रवेशोत्सव व नवागतांचा स्वागत सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. अशोकरावजी पवार व मार्गदर्शिका सौ. बर्वे मॅडम व पालकवर्ग उपस्थित होते.
सर्वप्रथम ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करुन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. विशेष करुन शाळेमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करत असलेल्या मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. यानंतर नवीन विद्यार्थ्यांना फुलांचे झाड व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यासोबत मुंबई स्थित उद्योगपती व हातखंबा हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री.शशिकांत पावसकर आणि श्री. दीपक कळवणकर यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
क्रीडांगणासाठी व भौतिक विकासासाठी सात लाख रुपये मंजूर
विद्यालयाचे हितचिंतक श्री शशिकांत पावसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञान आणि विज्ञानासोबत सुसंस्काराच्या मदतीने शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पहिल्याच दिवशी विशेष आनंदाची गोष्ट विद्यालयाला क्रीडा संचालनालय यांच्याकडून शाळेच्या क्रीडांगणासाठी व भौतिक विकासासाठी सात लाख रुपये मंजूर झाले असून त्याची प्रत श्री. गायकवाड यांच्या शुभहस्ते मुख्याध्यापकांना देण्यात आली. यावेळी दहावीच्या प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना सौ.बर्वे मॅडम यांनी बक्षिसे देऊन चॉकलेट दिले. दरम्यान या मुलांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी देखील जय्यत तयारी केली होती. नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी.एन. पाटील यांनी केले.