(संभाजीनगर)
मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक पंचतारांकित हॉटेल सोडून शासकीय विश्रामगृहात मुक्काम केला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाचं नियोजन असताना मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी निर्णय बदलत मुक्काम हलवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ मुंबईहून मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये हलवलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये कॅबिनेट बैठक होणार असून त्यात विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळासाठी संभाजीनगरमधील वेगवेगळ्या हॉटेलमधील 140 आलिशान रूम बुक करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या सोबत येणाऱ्या सर्व सचिवांची सोयही ताज हॉटेलमध्ये करण्यात आली होती. औरंगाबादेतील फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामाचं भाडं तब्बल ३२ हजार रुपये इतकं आहे. या हॉटेलचे 40 रूम बुक करण्यात आले होते. तसेच अमरप्रित हॉटेलमध्ये 70 रुम बुक करण्यात आली होते. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले होते, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार होती. तसेच मंत्रिमंडळाच्या लवाजमासाठी 300 गाड्या बुक करण्यात आल्या होत्या. मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला असताना, शेतकरी संकटात असताना मंत्र्यांच्या मुक्कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे विरोधकांनी चांगलीच टीका केली. या बातमीनंतर आणि विरोधकांच्या टीकेनंतर आता मुख्यमंत्र्यांनी आपला मुक्काम हा फाईव्ह स्टार हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात हलवला आहे.
कॅबिनेट मिटिंगसाठी शिंदे-फडणवीस सरकार औरंगाबादेत दाखल झालं आहे. परंतु सचिव, अधिकारी आणि मंत्र्यांच्या राहण्याची सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. त्यावरून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यामुळं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रामा इंटरनॅशनल हॉटेलच्या आलिशान सूटमध्ये राहणार होते. परंतु त्यांनी अचानक निर्णय बदलत शासकीय विश्रामगृहात मुक्काम ठोकला आहे.