(चिपळूण)
भव्य ‘रेल रोको आंदोलन’ दि.२६ जानेवारी रोजी होणार आहे. या रेल रोको आंदोलनाची दखल खासदार सुनिल तटकरे तसेच खासदार विनायक राऊत यांनी घेतली असून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन संपर्क साधला आहे.तसेच रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे खासदार तटकरे यांनी चर्चा केली आहे.
दि.२६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा.चिपळूण रेल्वे स्टेशनवर कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे.आंदोलन जाहीर केल्यावर शिवसेना नेते आमदार भास्करशेठ जाधव, आमदार शेखर निकम, माजी खासदार हुसेनभाई दलवाई,माजी आमदार रमेशभाई कदम, सदानंद चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आंदोलनामध्ये कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने ज्या मागण्या केल्या आहेत, त्या मागण्या मान्य कराव्यात असे सुचविले आहे.
मात्र गेली अनेक वर्षे रेल्वे प्रशासन समितीच्या काही मागण्यांना अपूर्ण असल्याने यावेळी अन्याय निवारण समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.दहा ते बारा हजार नागरिकांना या आंदोलनात सहभागी करण्यासाठी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम विभागवार बैठका घेऊन लोकांना आंदोलनासाठी येण्याचे आवाहन करीत आहेत.त्यांच्या बैठकांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे हे आंदोलन यशस्वी होणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाची धावपळ होत आहे
दरम्यान या आंदोलनाची दखल खासदार विनायक राऊत व खासदार सुनील तटकरे यांनी घेतली असून दोघांनीही अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांच्याकडे संपर्क साधला आहे. लवकरच या संदर्भात जिल्हाधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून बैठक आयोजित केली जाईल.त्या बैठकीत सर्व मागण्याबत योग्य मार्ग काढला जाईल,अशी माहिती देखील देण्यात आली आहे.मात्र बैठकीत मागण्या बाबत सकारात्मक भूमिका घेतली गेली नाही तर मात्र आंदोलन करणारच अशी भूमिका घेत आंदोलनाची तयारी सुरू ठेवण्यात आली आहे.