(चिपळूण/ओंकार रेळेकर)
चिपळूण मधील सामाजिक चळवळीत सातत्याने पुढाकार घेऊन सेवाकार्य करणाऱ्या चिपळूण मधील माजी उपनगराध्यक्षा तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. गौरीताई जीवन रेळेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्याचे उद्योग मंत्री, पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हा जिल्हास्तरीय वयक्तिक पुरस्कार शाल श्रीफळ प्रमाणपत्र दहा हजार धनादेश असा सौ.गौरी रेळेकर यांना देण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे हॉलमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
सौ .रेळेकर सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना विविध सामाजिक संस्था,संघटना आदी ठिकाणी त्या सक्रीय आहेत.चिपळूण च्या माजी उपनगराध्यक्षा सिध्दीविनायक मंदिर सदस्या, खरेदी विक्री संघ संचालिका, नवकोकण एज्युकेशन सोसायटी संचालिका, लायनेस क्लब अध्यक्षा, नामदेव शिंपी समाज विश्वस्त अशा विविध पदावर त्या सक्रीय आहेत. महिलांवरील अत्याचार, शैक्षणिक मदत कार्य, शासकीय विविध प्रकारचे दाखले, शहरात तसेच पेठमाप प्रभागातील सार्वजनिक विकास कामे याकरीता सौ.गौरी रेळेकर नेहमी अग्रेसर असतात.
सन २००५. सन २०२१ मध्ये आलेल्या प्रलयकारी महापुरातही त्यांचे मदतकार्य उल्लेखनीय झाले होते. महापूर संकटामध्ये स्वतःच्या घरी पुराचे पाणी असूनही घरची परवा न करता येथील गरजवंतांच्या मदत कार्यासाठी रेळेकर यांचा पुढाकार होता. शासन आणि सामाजिक संस्था यांच्याकडून पेठमप करता आलेले मदत कार्य त्यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले होते. शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजेत प्रत्यक्ष लाभार्थ्याला त्याचा लाभ झाला पाहिजे, यासाठी त्यांची सतत तळमळ असते. त्यांच्या या सामाजिक कार्यामध्ये त्यांचे पती चिपळूण मधील प्रसिद्ध कायदे व विधीतज्ञ अँड. जीवन रेळेकर यांचे त्यांना सतत प्रोत्साहन असते व मोलाचे सहकारी असते.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका, उपनगराध्यक्ष असताना देखील काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात यशस्वी विकास कार्यक्रम त्यांनी राबविला होता. या काळात वरिष्ठांनीही देखील त्यांच्यावर कौतुकाची थाप मारली होती .या कार्यक्रमाला माधवी पाथरे, छाया कपडेकर, रविना गुजर, आशा आंबेकर आदी उपस्थित होत्या. ना.उदय सामंत यांनी सौ.गौरी रेळेकर यांचे विशेष अभिनंदन केले.
फोटो : ना.उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सौ.गौरी रेळेकर यांना सन्मानित करण्यात आले या वेळी सोबत मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत
(छाया : ओंकार रेळेकर)