(चिपळूण / ओंकार रेळेकर)
चिपळूणच्या कर्तव्यदक्ष परिक्षेत्र वनाधिकारी सौ. राजश्री कीर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यात विनापरवाना लाकूडतोड करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्याची मोहीम वनविभागाकडून हाती घेण्यात आली असून तालुक्यात विनापरवाना लाकूडतोड करणाऱ्या वीर येथील एकावर कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हयातील जंगल तोडीमुळे मोठया प्रमाणात निसर्गाचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर जैवविविधता धोक्यात आली असून वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत चालले आहेत. अनधिकृत, बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी वनविभागाने केलेल्या आवाहनाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या बातमीनुसार मौजे वीर (चिपळूण) येथील महादेव हरि वीरकर यांच्या मालकी क्षेत्रातील मनाई जातीची एकूण १४५ व बिगर मनाई जातीची एकूण २५३ झाडे विनापरवाना तोड केल्याचे निदर्शनास आल्याने सदर झाड तोडीपासून तयार केलेला इमारती अनगड नग २१/३.७४० घ. मी. व मनाई / बिगर मनाई जळावू किटा २२८ घ.मी. इतका लाकूड माल जप्त केला. तसेच नारदखेरकी येथील शिवाजी अंबाजी यादव यांच्या मालकी क्षेत्रातील मनाई जातीची एकूण १० व बिगर मनाई जातीची एकूण ९५ झाडे विनापरवाना तोड केल्याचे निदर्शनास आल्याने सदर झाडतोडीपासून तयार केलेला इमारती अनगड नग १००/५.६३० घ.मी. व मनाई / बिगर मनाई जळावू किटा ८९.९०० घ.मी. इतका लाकूड माल जप्त करण्यात आला.
या दोन्ही कारवाया सावर्डे वनपाल उमेश म. आखाडे व गुढे वनरक्षक आश्विनी आ. जाधव यांनी परिक्षेत्र वन अधिकारी राजेश्री चं. किर यांच्या मार्गदर्शनाखाली केल्या असून पुढील चौकशी वनपाल सावर्डे व वनरक्षक गुढे यांचेमार्फत सुरु आहे. गावपातळीवर अवैध वृक्षतोड अथवा अवैध वाहतूक सुरु असल्यास याबाबत स्थानिक वन अधिकारी यांच्याशी तत्काळ सपंर्क साधण्याबाबत अथवा वनविभागाचा टोल फ्री क्र. १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी केले आहे.