(चिपळूण / प्रतिनिधी)
महामार्गावरील उनाड गुरांमुळे नागरिकांसह वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. चिपळुणात दोन उनाड बैलांमध्ये लागलेल्या झुंजीत एका पिसाळलेल्या बैलाने कामगाराला जोरदार धडक दिल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उस्मान खान मोहम्मद सल्लामू (36, उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. ही घटना रविवार १ जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. कामथे येथे रोड नजीक चेतक कंपनीचे शेकडो कामगार राहतात. याच ठिकाणी मोकाट सुटलेल्या दोन बैलांची अचानकपणे झुंज लागली. यानंतर एका बैलाने दुसऱ्या बैलाचा पाठलाग केला. यावेळी पाठलाग करण्यासाठी मागे लागलेल्या एका बैलाने मोहम्मद सल्लामू याला जोरदार धडक देत उडवून दिले. यामध्ये तो जमिनीवर कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा मदतीसाठी अन्य कामगार धावले, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.