चुलत्याने मारल्याच्या रागातून चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे, तर दहिवली येथे २८ वर्षीय तरुणाने मानसिक आजारातून आत्महत्या केली़ या दाेन्ही घटना बुधवारी घडल्या असून, पाेलीस स्थानकात नाेंद करण्यात आली आहे़
सूरज सदानंद शिंदे (३०, रा़ पेढांबे-दाभाडेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याची खबर सदानंद सखाराम शिंदे (५८, रा़ पेढांबे – दाभाडेवाडी) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदानंद यांची पत्नी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची माहिती घेण्यासाठी चिपळूण येथे गेली होती. सूरजने याबाबत विचारणा केली असता, लॉकडाऊनमुळे तारखा लागल्या नाहीत, असे सांगितले.
त्यामुळे सूरज दारूच्या नशेत सदानंद यांच्या आईस बडबडत होता. तेव्हा सदानंद शिंदे यांच्या चुलत भावाने गैरसमज करून सूरजला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यात त्यांच्यात वादविवाद होऊन चुलत्यांनी सूरजला हाताने मारहाण केली. त्या रागात मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास दरवाजाला आतून कडी लावून हॉलच्या लोखंडी चॅनलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची अलोर -शिरगाव पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेत दहिवली बुद्रुक निमेवाडी येथील अमोल हेमकिरण घाग (२८) हा मानसिक आजारी असल्याने त्याने बुधवारी सकाळी ७.३० ते ८.४५ च्या कालावधीत कातळाचे शेत येथे गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची हेमकिरण गोंविद घाग (६४, रा़ दहिवली बुद्रुक निमेवाडी) यांनी सावर्डे पोलीस स्थानकात नोंद केली आहे.