(चिपळूण / ओंकार रेळेकर)
तालुक्यातील कळवंडे येथील “धरणाला गळती लागली आहे” या नावाखाली मिलीभगत करून धरणाचे काम सुरू केले. मात्र ते काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याने एका बाजूची भिंत घसरली असून धरणातलं पाणी सुद्धा सर्व खाली करण्यात आलेले आहे. येथील लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न समोर आल्याने या संदर्भात चर्चा करण्यासाठी कळवंडे दत्त मंदिर येथे मंगळवार दिनांक ४ रोजी सायंकाळी ४ वाजता लघुपाटबंधारे चे उपअभियंता विपुल खोत यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी कळवंडे शिरळ पाचाड कोंढे येथील शेतकरी उपस्थित होते. उद्योजक वसंत उदेग यांनी यावेळी अधिकाऱ्याना धारेवर धरत हे धरण नेमकं कुणासाठी. शेतकऱ्यांसाठी कि ठेकेदारासाठी? असा सवाल अधिकारांना केला. मात्र त्यावर अधिकारी काहीच समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
कळवंडे येथे बांधलेल्या धरणाला सुमारे 43 वर्ष झाली आहेत. या वर्षांमध्ये कधीच गळती लागली नाही. धरणाला धोका निर्माण झाला असे कुठल्याच ग्रामस्थांनी सांगितले नाही. या धरणाला पूर्वीपासूनच पाझर आहे आणि गेली कित्येक वर्षे तो सुरू आहे. मग त्यापासून कधीच धरणाला धोका निर्माण झाला नव्हता, मात्र गेले दोन वर्ष गळती काढण्याच्या नावाखाली आपली मलई साधण्यासाठी वारंवार या धरणाच्या दुरुस्तीचा उपक्रम हाती घेतला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात या दुरुस्ती नावाखाली धरणातील संपूर्ण पाणी सोडून दिले. त्यामुळे कृषी पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या कळवंडे गावातील शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली. याच पाण्यावरती शेतकरी भाजीपाला आणि शेती व इतर व्यवसाय करीत होता. त्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झाला होता. मात्र याची जाणीव न ठेवता हा दुरुस्तीचा कार्यक्रम केला गेला. हे करताना या धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची सुद्धा दुरावस्था झालेली आहे. मोठमोठे खड्डे रस्त्याला पडलेले आहेत. हा रस्ता सुद्धा आता चालण्याच्या योग्यतेचा राहिला नाही. याच रस्त्याने ग्रामस्थ ग्रामपंचायत विविध कार्यकारी सोसायटी उपआरोग्य केंद्र या ठिकाणी येत असतात. त्यांची रस्ता उखळल्याने मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उद्योजक वसंत उदेग यांनी आपली भूमिका प्रथमच स्पष्ट केली. धरणासंदर्भातील काही प्रश्न आणि समस्या निर्माण झाले आहेत त्या त्यांनी प्रथम मांडल्या.
वसंत उदेग यांनी सांगितले की, यामुळे दुःखाची छाया आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या नजरेत एक भीतीच वातावरण निर्माण झालेले आहे. धरण दुरुस्ती करताना धरणाची एका बाजूची भिंतच कोसळली आहे. गळती थांबवण्यासाठी प्लास्टिक टाकून त्यावर माती टाकण्यात आली. मात्र, पहिल्याच पावसात माती वाहून गेली आणि ठेकेदाराची करणी समोर आली. प्लास्टिक टाकून धरणाची गळती करण्याचे काम कुणी आजपर्यंत केले नाही असं सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. हे संकट नैसर्गिक आहे की मानवनिर्मित आहे याचा सुद्धा विचार करण्याचे गरज आहे. कुठलीही गोष्ट घडण्याआधी त्याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. धरणाला गळती कधी लागली नव्हती. पण दरवर्षी गळती काढली जाते पण कोणाला विश्वास घेतले जात नाही. येथील धरण पाणी कमिटी आहे त्या सदस्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले जात नाही. कळवंडे ग्रामपंचायतीला कुठलीही कल्पना न देता ही सर्व कामे केली जातात. यामुळे येथील शेतकरी व ग्रामस्थ नाराज झाले आहेत. या धरणावर शेतकरी अवलंबून आहेत हे नेमके धरण कुणासाठी असा पुन्हा एकदा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. अनेक प्रश्न यावेळी उपस्थित झाले यावेळी तिवरे धरण दुर्घटना याची आठवण करून अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांची अवस्था आजही बिकट आहे. जर आमच्या मृत्यूनंतर शासन आम्हाला पाच लाख रुपये देत असेल तर त्याचा उपयोग काय असाच व सवाल या बैठकीत शेतकऱ्यांनी विचारला. या धरणामुळे आमच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे. याची जबाबदारी तुम्ही लेखी स्वरूपात द्यावी असे वसंत उदेग यांनी बोलताना सांगितले. त्यांच्या म्हणण्याला संपूर्ण शेतकऱ्यांनी एकमुखी पाठिंबा देत उखडलेला रस्ता सुध्दा लवकर दुरुस्ती करून द्यावा. त्याचबरोबर कोणतेही काम करताना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
या बैठकीत धरणासंदर्भात माहिती देताना लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विपुल खोत म्हणाले की, धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पाणीसाठा दोन महिन्यांमध्ये होणार आहे. चार दिवसात काम पूर्ण होईल. रस्ता पूर्ण दुरुस्ती करून दिला जाईल. या धरण संदर्भाचा अहवाल आम्ही जिल्हाधिकारी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिलेला आहे. आम्ही या धरणावर लक्ष ठेवण्यासाठी खास एक व्यक्ती कायमस्वरूपी त्या ठिकाणी ठेवली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले. मात्र यावर ग्रामस्थांचे समाधान झालं नाही. पाचाड, कळवंडे, कोंढे शिरळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते.
ज्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत बैठकीला उपस्थित राहण्याचे पत्र दिले होते ते अनुपस्थित राहिले असल्याचे ग्रामस्थ नाराज झाले होते. निश्चितच अशा अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी. त्यांना आमच्या जीवनाची काळजी नाही असे यातून दिसत आहे. आमच्या जीविताची जबाबदारी कोण स्वीकारणार यासंदर्भात लेखी लिहून पाहिजे अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
या चर्चासत्राला लघुपाटबंधारे विभाग उप अभियंता विपुल खोत, पाणीपुरवठा अधिकारी दीपक गवस, तहसीलदार मधील अधिकारी श्री मोरे, उद्योजक वसंत उदेग, सरपंच संजय नाचरे, पाचाडचे सरपंच नागेश घोले, माजी पंचायत समिती सदस्य सुनील तटकरे, प्रकाश खेडेकर, आणि सर्व शेतकरी वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : कळवंडे दत्तमंदिर येथे आयोजित ग्रामस्थ आणि अधिकारी बैठकीत मार्गदर्शन करतांना यशस्वी शेतकरी वसंत उदेग छायाचित्रात दिसत आहेत तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थित ग्रामस्थ मंडळी
(छाया : ओंकार रेळेकर)