चिपळूण : चिपळूण महाप्रलयात उदध्वस्त झालेले चिपळूण शहर आणि परिसर याला मोठ्या प्रमाणावर मदत आली मात्र भविष्याचा विचार करता पूरग्रस्त चिपळूणबाबत व्यापक आणि सर्व परिमाणांचा विचार करुन जागतिक दर्जाच्या पर्यावरण, वास्तुशास्त्रज्ञांना सोबत घेत सर्व समावेशक डिझास्टर प्लॅन करावा लागेल. राष्ट्र सेवादल यांत प्रमुख भूमिका घेईल. आपण स्वत: यासाठी वेळ देऊ. आणि नवे चिपळूण उभारण्याच्या आराखडा शासनाला देऊ असे राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री डॅा. गणेश देवी यांनी सांगितले.
महाप्रलयात उध्वस्त चिपळूणला मदतीचा हात देण्यासाठी तत्परतेने कार्यरत असणार्या तमाम महाराष्ट्राच्या विविध भागातील राष्ट्रसेवादल पथक सैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि पुरग्रस्तांच भागाची पहाणी करण्यासाठी डॅा. गणेश देवी चिपळूण येथे आले होते. त्यावेळी पूरग्रस्त परिस्थितीत काम करणारे कार्यकर्ते, पर्यावरण तज्ञ, यांचे सोबत आयोजित संवाद बैठकीत विचार व्यक्त केले
या चर्चा सत्राचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रसेवादल राष्ट्रीय समिती सदस्य अभिजित हेगशेटये यांनी २४ जुलै पासून राष्ट्रसेवादलाने पूरग्रस्त भागात सेवादल पथकाने केलेले श्रमदान , मदत कार्य यात महाराष्ट्रातील विविध भागातील सहभागी सेवादल पथके यांच्या कार्याचा अहवाल देतांनाच बदलते पर्यावरण आणि पूराची वाढलेली पातळी यामुळे काही लाख वस्ती असणारे हे शहर आणि वसीष्टीच्या खोर्यातील मानवी वसाहत आणि शेती उद्योगच धोकादायक रेषेच्या कक्षेत आले आहेत यांवर कायमस्वरुपी ठोस संशोधनात्मक पर्याय उपाय यांची गरज आहे असे सुचविले.
चिपळूण येथील पूरात बुडालेल्या डॅा. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला त्यांनी भेट दिली. हजारो भिजलेले ग्रंथ पाहून ते अस्वस्थ झाले. या ग्रंथालयासाठी आपल्या २०० मित्रांना पुस्तक देण्याचे आवाहन करत किमान १०-१५ हजार पुस्तके देण्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वडार कॅालनी येथील पडल्या घरांना त्यांनी भेट दिली . त्यातील दोन व्यक्तींना थेट आर्थिक मदत सेवादला तर्फे देण्याचे त्यांनी सांगितले. मिरज सेवादल पथकाने स्वच्छता केलेल्या महात्मा गांधी स्मारक परिसराला त्यांनी भेट दिली. यावेळी पूरग्रस्तभागात काम करणारे पर्यावरणीय आणि आरोग्य अभ्यासक डॅा. राजे, डॅा. परमेश्वर गोंड, पंकज दळवी, युयुत्सू आर्ते यांनी आपले विचार व्यक्त केले.
डॅा. देवी यांनी जागतिक पातळीवरील विविध संदर्भ देतांना पर्यावरण आणि पूरपरिस्थीचा विचार करुन नवा आराखडा करणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्यांचे सहकार्याने ४० विद्यार्थी चिपळूण पूरग्रस्त भागासाठी आलेली मदत आणि देणारे मदत यांचा एक माहिती तक्ता तयार करतील. येथील पर्यावरणीय अहवाल याचा अभ्यास करुन काही तज्ञ आणि संशोधकांच्या मदतीने एक व्यापक चर्चा सत्र पुढील महिन्यात चिपळूण येथे घेऊ आणि हा नवा डिझास्टर प्लॅन उभारत चिपळूण ला पूरमुक्ततेसाठी आश्वस्थ करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. पूरपरिस्थिती अथवा आपत्कालीन परिस्थितीची सुचना देणारा ॲप विकसीत करणे शक्य असल्याचे सुचीत केले.
पूरग्रस्त परिस्थितीत काम करणारे सेवादल कार्यकर्ते आणि श्रमदान पथके यांतील प्रातिनिधिक कार्यकर्ता म्हणून वाडकर, प्रा . सुनिल साळवी, मातृमंदिरचे सीईओ सतीश शिर्के , नवनाथ कांबळे, दशरथ घाणेकर आणि सानिका कदम या केंद्रावर पूर्णवेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांचा डॅा. देवी यांच्या हस्ते पुष्प देऊन विशेष कौतुक करण्यात आले. चिपळूण पूरग्रस्त मदत नियंत्रण नियोजन कार्यात विशेष काम करणारे शरयू इंदूलकर, अनिल काळे, शिल्पा रेडीज, सुनिल खेडेकर, जाफर गोठे, प्रकाश सरस्वती (डाकवे), सई वरवाटकर, राम शास्त्री, राजन इंदूलकर , डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह यांच्या सहकार्य आणि योगदाना बद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. संजय घवाळे यांनी महाविद्यालयाचे वतीने डॅां. देवी यांचे स्वागत करतांना आंतरराष्ट्रीय किर्तीचे भाषा तज्ञ डॅा. गणेश देवी यांचे चिपळूण येथे या महाविद्यालयात स्वागत करतांना मला विशेष आनंद होत आहे. त्यांच्या कार्यात आमचा सदैव सहभाग असेल असे सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन डॅा. ज्ञानोबा कदम यांनी केले. राष्ट्र सेवा दल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रमाकांत सकपाळ यांनी अध्यक्षीय भाषणात पुरस्थितीबाबतची निरीक्षणे व मदत केंद्राच्या कामाची माहिती देत डॉ. देवी व उपस्थित सर्वांचे आभार मानले.