(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे शासकीय विश्रामगृहासमोर कार व दुचाकी यांच्यात अपघात झाल्याची घटना रविवारी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुचाकीच्या मागे बसलेल्या प्रौढाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातप्रकरणी कारचालकावर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशांत शनेशकुमार लकडे (२२, कापसाळ) असे गुन्हा दाखल झालेल्या कारचालकाचे नाव आहे. तर या अपघातात श्रीपत महादेव तांबडे (४८, कापसाळ) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार शशिकांत शांताराम महाडिक (कापसाळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत महाडिक हे श्रीपत तांबडे यांना दुचाकीच्या मागे बसवून कापसाळच्या दिशेने जात होते. यावेळी या मार्गावरून निशांत लकडे कार घेऊन कापसाळच्या दिशेने जात होता.
शासकीय विश्रामगृहासमोर निशांत लकडे याने महाडिक यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, या अपघातात शशिकांत महाडिक व मागे बसलेले श्रीपत तांबडे हे गंभीर जखमी झाले. यातील तांबडे यांना सर्वाधिक दुखापत झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना डेरवण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच त्यांचे सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले.
अपघातातील जखमी शशिकांत महाडिक यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातप्रकरणी कारचालक निशांत लकडे याच्यावर चिपळूण पोलिस स्थानकात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.