(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुख नगरपंचायतीने नवीन पद्धतीने घरपट्टी आकारणी करत नागरिकांना नोटीस बजावल्या होत्या. यात घरपट्टीमध्ये सरासरी दुप्पट व तिप्पट वाढ केली आहे. या अचानक केलेल्या वाढीबाबत पालकमंत्री उदय सामान यांची रविवारी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये यांनी सहऱ्यांसमवेत पाली (ता. रत्नागिरी) भेट घेऊन व्यथा मांडली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी तत्काळ या प्रक्रियेस स्थगिती दिली आहे.
चिपळूण येथील वाढीव घरपट्टीचा विषय चर्चेत असतानाच देवरुख नगरपंचायतीने वाढीव घरपट्टी केल्याचा विषय पुढे आला आहे. याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी चिपळूणप्रमाणेच देवरुख येथील वाढीव घरपट्टी निर्णयाला स्थगिती दिली आहे. देवरुखमधील सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत घरपट्टीमध्ये वाढ करू नये, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
यावेळी देवरुख भाजप शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये, भाजप तालुका उपाध्यक्ष महेश धामणस्कर, शिवसेना शहरप्रमुख सनी प्रसादे, ‘आपले देवरुख, सुंदर देवरुख’ व्हॉट्सॲप समूहाचे निमंत्रक हेमंत तांबे, संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सागर शेट्ये, भाजपा क्रीडा सेल अध्यक्ष दत्ता नार्वेकर, ज्येष्ठ भाजपा सदस्य सत्यवान बोरूकर, आभास वळवी, पत्रकार प्रमोद हर्डीकर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे आता देवरुख नगरपंचायत प्रशासनाला वाढवलेल्या घरपट्टीबाबत विचार करावा लागणार आहे. मात्र, मंत्री सामंत यांच्या निर्णयामुळे थोड्याअंशी का होईना, देवरुखातील नागरिकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.