( चिपळूण / इकलाक खान)
चिपळूण येथील उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांची रायगड जिल्ह्यात बदली झाली आहे. भूसंपादन या विभागाचे उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना बढती देण्यात आली आहे. गेले तीन वर्षाहून अधिक काळ ते चिपळूणचे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते.
महाराष्ट्र शासनाने महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये प्रवीण पवार यांचा समावेश आहे. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी प्रवीण पवार चिपळूणात उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी म्हणून रुजू झाले होते. त्यावेळी येथील महामार्ग चौपदरीकरण व भूसंपादन व मोबदला अशी तिहेरी प्रक्रिया सुरू होती. अनेक वाद त्यावेळी निर्माण झाले होते.प्रवीण पवार यांनी अत्यंत कुशलतेने ते सर्व विषय हाताळले होते.
कोरोना काळ आणि चिपळूणात आलेला महापुर या नैसर्गिक आपत्तीत त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती.येथील वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा विषयात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शासन दरबारी केलेला पाठपुरावा आणि जनतेशी ठेवलेला संवाद महत्वाचा ठरला होता. साडेतीन वर्षानंतर आता त्यांची पुन्हा एकदा रायगड येथे बदली झाली आहे. परंतु ही फक्त प्रशासकीय बदली नसून त्यांना उपजिल्हाधिकारी म्हणून बढती देखील देण्यात आली आहे.