(चिपळूण/प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्याला धान्य पुरवठा करणाऱ्या येथील शासकीय धान्य गोदाम परिसरातील डांबरीकरणाचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. तब्बल १० लाख रुपये खर्चातून केलेले डांबरीकरण अवघ्या महिनाभरातच उखडल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात मालवाहतूक व अवजड वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने पावसाळ्यात आणखी खड्डे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी तक्रार दिली आहे. तसेच हे काम बोगस असल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहरातील उक्ताड येथे तालुक्याचे धान्य साठा व पुरवठ्याचे गोदाम असून या गोदामात मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा व वाहतूक केली जाते.
अनेक वर्षापासून गोदामाचे आवार व परिसरात प्रचंड मोठे खड्डे पडलेले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. आता सुमारे २ वर्षानंतर या गोदामाच्या आवारात पक्क्या स्वरुपाचे डांबरीकरणाचे काम सार्वजनिक विभागामार्फत करण्यात आले आहे. परंतु हे डांबरीकरण काही दिवसांतच उखडले आहे. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी सार्वजिनक बांधकाम उपविभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे.
याबाबत मुकादम यांनी म्हटले आहे की, इतक्या वर्षानंतर प्रथमच या आवाराचे डांबरीकरणाचे काम झाले. त्यामुळे या कामाविषयी फार समाधान वाटले होते. मात्र या डांबरीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता हे काम पुर्णपणे निष्कृष्ठ दर्जाचे व बोगस स्वरुपाचे झालेले आहे. या कामात फसवणूक करण्यात आलेली आहे हे प्रथम दर्शनी स्पष्टपणे दिसून येत आहे.
या आवारात केलेले डांबरीकरण काम पुर्ण उखडलेले गेले असून ठिकठिकाणी मोठे मोठे स्वरुपाचे खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणचा भाग पुर्ण खचलेला आहे. या डांबरीकरणाच्या कामात वापरलेले डांबर व खडी तसेच तत्सम साहित्य अत्यंत दर्जाहिन स्वरुपाचे वापरण्यात आले आहे. सदरचे काम अंदाजपत्रकीय आराखड्यानुसार करण्यात आलेले नाही. तसेच लाखो रुपये खर्च करून केलेले काम पुर्णपणे निकृष्ठ दर्जाचे झालेले असल्याने या कामात आर्थिक लाभाच्या उद्देशाने फसवणूक करण्यात आलेली आहे. आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कामाची पडताळणी व सखोल चौकशी करून सदरच्या कामावर नियंत्रण व देखभाल करणारे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या विरुद्ध योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. मुकादम यांनी केली आहे.