(चिपळूण / प्रतिनिधी)
जातीय तेढ निर्माण होईल अशाप्रकारे सोशल मीडियावर कमेंट करणाऱ्या व्यक्तीला अटक करावी, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी चिपळूण पोलिस ठाण्यात कोंढे येथील ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मिथून कृष्णा होळकर (रा. कोंढे) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
या बाबत सतीश हरिश्चंद्र जाधव (३८, रा. कळवंडे) यांनी फिर्याद दिली आहे. सतीश जाधव यांचे मित्र स्वप्नील कदम याने सोशल मीडियावर व फेसबूकवर वादग्रस्त मेसेज केला होता. या व्हिडीओवर मिथून होळकर याने समाजबांधवांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी कमेंट केली. या घटनेनंतर बौद्ध समाजबांधवांच्या भावना दुखावल्याने त्यांनी पोलिस ठाणे गाठले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव, तालुकाध्यक्ष महेश सकपाळ, रिपब्लिक सेनेचे संदेश मोहिते, आरपीआय तालुकाध्यक्ष प्रशांत मोहिते, प्रतिशोध कदम, बौद्धजन हितसंरक्षक समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सावंत, उमेश सकपाळ, विद्याधर गमरे आदी चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झाले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्याकडे त्यांनी कारवाई करण्याची मागणी केली. अखेर पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होळकर याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.