( चिपळूण)
तालुक्यातील रिक्टोली-इंदापूर येथे एका वयोवृध्द महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. निर्मला शिंदे (75, रिक्टोली) असे संशयास्पद मृत्यू झालेल्या वयोवृध्द महीलेचे नाव आहे. शिंदे यांचा मुलगा व मुलगी हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. शुक्रवारी शिंदे या सकाळी पाणी भरण्यासाठी न आल्याने त्यांना पुतण्या पाहण्यासाठी घरी गेला असता त्या रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्या होत्या. शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यानंतर हा मृत्यू घातपात असल्याचा प्रकार पुढे आला. शिंदे यांच्या घरातील साहित्य हे अस्ताव्यस्त पडले होते. त्यानुसार चोरीच्या उद्देशाने हा प्रकार केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या बाबत अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.