(चिपळूण )
इंडियन मेडीकल असोसिएशनच्यावतीने उद्या दि. 4 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय पारितोषीक वितरण गुणगौरव समारंभ आणि कलादर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला इंडियन मेडीकल असोसिएशनचे राज्यभरातील डॉक्टर उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती इंडियन मेडीकल असोसिएशन चिपळूणचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव व डॉ. अब्बास जबले यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.
या बाबत बोलताना डॉ. यतीन जाधव म्हणाले, आयएमएने प्रथमच चिपळूणला हा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी दिली आहे. शहरातील बांदल सभागृह येथे सायंकाळी 4 वा. हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, माजी आ. सदानंद चव्हाण, रमेश कदम, आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जि. प.चे सीईओ किर्ती किरण पुजार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र राजमाने, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, डॉ. जयेश लेले, डॉ. रामकृष्ण लोंढे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव, संतोष कदम, डॉ. राजेश इंगोले, संतोष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
या कार्यक्रमात आयएमएने राज्यभर घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या डॉक्टरांचा गौरव होणार आहे. तसेच विविध कलेमध्ये पारंगत असणारे डॉक्टर यावेळी आपली कला सादर करणार आहेत. तसेच चिपळूणमधील डॉक्टरांचा कलादर्पण हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाची जबाबदारी डाॅ. कांचन मदार यांच्यावर आहे. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. मदार, डॉ. ज्योती यादव, डाॅ. मनिषा वाघमारे आणि डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे आहे.
यावेळी चिपळुणातील डॉक्टरांचा देखील गौरव केला जाणार आहे. प्रथमच चिपळूणमध्ये राज्यभरातील डॉक्टर्स उपस्थित राहाणार असून या सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोकणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, कलाकारांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन, खाद्यपदार्थ तसेच राज्यभरातून आलेल्या डॉक्टरांसाठी परिसर पर्यटन दर्शनचे आयोजन करण्यात आले आहे.