(चिपळूण)
तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी महिलांनी मंगळवारी (७ नोव्हेंबर) पोलिस स्थानकावर धडक दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर चिपळूण पोलिस स्थानकात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
संशयित व्यक्तीची गावात भातशेती असून, आठ दिवसांपूर्वी संशयित व्यक्तीने पत्नीला भात कापण्यासाठी शेतावर पाठवले आणि तो घरातच थांबला. पत्नीला संशय आल्यानंतर पत्नी पुन्हा घरी आली असता अल्पवयीन मुलगी आणि संशयित व्यक्ती घरात एकत्र संशयास्पद कृत्य करताना आढळले. त्यानंतर त्याच्या पत्नीने घरातच गोंधळ घातला. त्यामुळे आजूबाजूचे ग्रामस्थ जमा झाले. या प्रकारानंतर गावात बैठक घेण्यात आली.
या बैठकीत संशयित व्यक्तीला गावातील प्रतिष्ठित लोकांनी जाबही विचारला. यावेळी संबंधित पीडित मुलीने आपल्याला धमकावून चार ते पाच वेळा शरीरसंबंध ठेवल्याचे सांगितले. या बैठकीत योग्य तोडगा न निघाल्याने मुलीचे नातेवाईक आणि पन्नासहून अधिक महिलांनी चिपळूण पोलिस स्थानकावर धडक दिली. त्यानंतर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.