(चिपळूण)
आयसीआयसीआय बँकेतून बोलतोय, असे सांगून मोबाईलवर पाठवलेली लिंक डाउनलोड केल्यानंतर त्यातूनच ६२ हजार ७७३ रुपयाची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. याप्रकरणी चिपळूण पोलिस स्थानकात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची फिर्याद अमर अनिल नलावडे (३३, चिपळूण) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारः अमर हा त्याच्या घरी असताना त्याच्या मोबाईलवर अज्ञाताने फोन करून आयसीआयसीआय बँकेतून बोलतोय, असे सांगितले. यावेळी अमरच्या क्रेडिट कार्डची माहिती विचारण्यात आली. तसेच त्याच्या मोबाईलवर पाठवण्यात आलेली लिंक अज्ञाताने डाऊनलोड करण्यास भाग पाडले.
यातच अमरच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड खात्यातून सहावेळा व्यवहार करून ६२ हजार ७७३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. हा प्रकार अमरच्या लक्षात येताच त्याने चिपळूण पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अशा पद्धतीचे फसवणुकीचे प्रकार वारंवार घडत आहेत. आतापर्यंत हजारो लोक अशा जाळ्यात सापडले असून, त्यांना सायबर चोरांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.