(संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोकणचा निसर्ग सर्वांनाच भुरळ घालतो . कोकण पहाण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत असतात . अशा कोकणात अनेक कलाकार जन्माला आले . या कलाकारांनी कलाक्षेत्रात मोठी किर्ती मिळवली असली तरीही त्यांच्या कलेचा आस्वाद कोकणवासीयांना कधी घेता आला नाही . कोकणवासीयांना कलाकृती पहाता याव्यात त्यातील आनंद लुटता यावा यासाठी साडवली सह्याद्रीनगर येथील प्रथितयश चित्रकार शशी बने यांनी आपल्या अनमोल अशा कलाकृतींचे प्रदर्शन देवरुख येथील कला महाविद्यालयात १६ डिसेंबर पासून सलग २० दिवस आयोजित केले आहे . देवरुख कला महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनानिमित्त प्रात्यक्षिक आणि चित्रकला स्पर्धांचे देखील आयोजन केले असल्याची माहिती डिकॅड देवरुखचे प्राचार्य रणजित मराठे यांनी दिली .
चित्रकार शशी बने यांची कर्मभूमी जरी मुंबई असली , तरी जन्मभूमी देवरुख जवळील साडवली सह्याद्रीनगर ही आहे . कोल्हापूर , मुंबई येथे उच्च कलाशिक्षण घेताना कोल्हापूर येथील नामवंत कलाकारांच्या शैलीची भुरळ बने यांना पडली . यातून स्वतःची स्वतंत्र शैली तयार करण्याचा त्यांनी चंगच बांधला आणि त्यामध्ये बने यशस्वी देखील झाले . आपल्या कलाप्रवासात कोल्हापूर येथील नामवंत कलाकारांच्या शैलीचा खूप मोठा प्रभाव असल्याचे बने आवर्जून नमूद करतात .
वेगळ्या जीवनशैलीवर चित्र रेखाटन करण्यासाठी चित्रकार शशी बने राजस्थानला गेले . तेथे अनेक महिने राहून प्रथम त्यांनी राजस्थानातील ग्रामीण जीवनशैलीचा बारकाईने अभ्यास केला . तेथील ग्रामस्थांजवळ संवाद साधला . ही जीवनशैली प्रथम स्वतः अनुभवली आणि नंतर राजस्थानी जीवनशैलीवर असंख्य चित्र रेखाटली . शशी बने यांनी मुंबई , पुणे , कोल्हापूर , मंगलोर , बंगलोर , कोलकाता आदि ठिकाणी आजवर वैयक्तिक अशी २४ वेळा प्रदर्शने भरवली आहेत . तर देश विदेशात २३ वेळा ग्रूप शो केले आहेत . देश विदेशातील ५० पेक्षा अधिक मान्यवरांकडे शशी बने यांच्या चित्रांचा संग्रह आहे . बने यांनी एकूण सहा ठिकाणी अप्रतिम अशी म्युरल साकारली असून साडवली फार्मसी कॉलेज मध्ये त्यांचे एक म्युरल पहायला मिळते
कुंचल्याने ओळख दिली!
कुंचल्याने आपल्याला खरी ओळख दिली हे वास्तव आहे . मात्र ज्या कोकणात आपण जन्मलो तेथील बांधवांसमोर आपल्याला आपल्या कलाकृती मांडण्याची संधी कधीही मिळाली नाही याची आपल्याला नेहमीच खंत वाटत आली . अखेरीस देवरुख कला महाविद्यालयाचे प्राचार्य रणजित मराठे यांच्याकडे आपल्या चित्र प्रदर्शना बाबत बोलताच त्यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचे मान्य केले आणि म्हणूनच कोकणवासीयांना आपली चित्रे पहाण्याची संधी उपलब्ध झाली आहे .
– चित्रकार शशी बने
शशी बने यांचे चित्रप्रदर्शन ही सुवर्णसंधी !
एखाद्या कलाकाराची आजवर ५० पेक्षा अधिक चित्रप्रदर्शने होणे ही खूप मोठी बाब आहे . देशविदेशातील ५० मान्यवरांकडे अशा कलाकाराची चित्रे असणे हे त्यापेक्षाही खूप मोठे आहे . असा कलाकार नावाने खूप मोठा असूनही आपल्या कलाकृती कोकणवासीयांना पहाता याव्यात म्हणून धडपडत करत आहे , ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे . आम्ही आमच्या संस्था पदाधिकाऱ्यांजवळ चित्रकार शशी बने यांच्या चित्र प्रदर्शनाबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी यासाठी आनंदाने परवानगी दिली . चित्रकार शशी बने यांच्या चित्रांचे प्रदर्शन देवरुख कला महाविद्यालयात संपन्न होणार आहे , ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे . या प्रदर्शनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आम्ही करु
– रणजित मराठे ( प्राचार्य डिकॅड )