(रत्नागिरी)
रत्नागिरीतील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाचा ९० वा वर्धापनदिन आज साजरा करण्यात आला. सायंकाळी मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात विविध वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर भीमसेन रेगे म्हणाले की, ग्राहकाशी सौजन्याने, हसतमुखाने वागले पाहिजे. ते समाधानी असतील तरच यश मिळते. कोणताही व्यवसाय हा ३० ते ३५ वर्षे चालतो. त्यात नवनवीन बदल होत जातात. आमच्या गॅस एजन्सीच्या व्यवसायातही आता पाईपलाईन आली आहे. शांतादुर्गा गॅस एजन्सीचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. १९८४ मध्ये भावाने एजन्सी सुरू केली. वडिल गुरुनाथ रेगे तथा मास्तर यांनी मार्गदर्शन केले.
संस्कृतप्रेमी पुरस्कारप्राप्त जयंत अभ्यंकर यांनी गुरुजन, आई-वडिल यांचे ऋण व्यक्त करताना मंडळाच्या परतफेड शिष्यवृत्तीवर आणि भिक्षुकीवर शिक्षण पूर्ण केले. संस्कृतभाषा सर्वांनी बोलावी, प्रचार करावा, असे आवर्जून सांगितले. तसेच मंडळाने कधीही मदतीला हाक मारावी, मी व कुटुंबिय तयार आहोत, अशी ग्वाही दिली.
डॉ. अश्विनी गणपत्ये यांनी स्वा. सावरकरांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आम्ही यापुढेही विविध ठिकाणी सायकलवरून सहली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमृता करंदीकर, श्रीरंग जोगळेकर यांनी मंडळाचे आभार मानले. सीए मुकुंद मराठे यांनी मंडळाच्या ठेवी २ कोटी असून शतक महोत्सवी वर्षापर्यंत त्या १० कोटी व्हाव्यात, अशी सदिच्छा व्यक्त केली. मनाली जोशी हिने विद्यार्थिनी वसतीगृह व संस्थेचे विशेष आभार मानले. कॅडेट राजू पाटील, मनोहर भिडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या वेळी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, उपकार्याध्यक्ष नारायण शेवडे, उपाध्यक्ष स्मिता परांजपे, माजी पदाधिकारी स्नेहा परचुरे, कार्यकारिणी सदस्य आदी उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये श्री. जोशी यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या दहा वर्षांत मंडळाने परतफेड शिष्यवृत्ती २०० विद्यार्थ्यांना सुमारे ७० लाख रुपयांचे वितरण केले. २७ मार्च १९३३ रोजी स्थापन झालेल्या या मंडळाने आतापर्यंत तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली असून १०० टक्के परतफेड केली जात असल्याने ही योजना लोकप्रिय आहे, असे त्यांनी सांगितले.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी मंडळाचे विशेष आभार मानले. सहकार्यवाह अनंत आगाशे, सीए प्राजक्ता वैद्य, सीए मुकुंद मराठे यांनाही सन्मानित करण्यात आले. रत्नागिरी पर्यटन सेवा सहकारी संस्थेला मंडळातर्फे अर्थसाह्य देण्यात आले. गणित व संस्कृतमधील गुणवंतांना लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर पारितोषिके, समाजशास्त्र व मराठीतील गुणवंत विद्यार्थ्यांना (कै.) केशव अच्युत व (कै.) सुलोचना केशव जोशी पारितोषिके देण्यात आली. ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. ऑर्गनवादक पंडित विश्वनाथ कान्हेरे यांचा सत्कार वामन जोग यांच्या हस्ते करण्यात आला. मृणाल पुरोहित हिने सूत्रसंचालन केले.
पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती
(कै.) सौ. सुधा वसंत बडे आदर्श महिला पुरस्कार- सौ. माधवी मनोहर भिडे (संगमेश्वर), सौ. अमृता अजित करंदीकर (रत्नागिरी) आणि सौ. सई अरुण ओक (गुहागर), संस्कृतप्रेमी पुरस्कार जयंत विनायक अभ्यंकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार सौ. धनश्री श्रीनिवास गोखले आणि डॉ. अश्विनी तेजानंद गणपत्ये, थोरले बाजीराव पेशवे व मस्तानी पुत्र समशेर बहाद्दर पुरस्कार कॅडेट सिद्धांत राजू पाटील (गुरुवर्य दादोजी कोंडदेव, सैनिकी शाळा, तासगाव), आदर्श विद्यार्थी पुरस्कार- देवेश प्रकाश जोग याला आदर्श विद्यार्थीनी पुरस्कार मनाली संजय जोशी, जीवनगौरव पुरस्कार भीमसेन रेगे, युवा गौरव पुरस्कार ऋतुजा शैलेश मुकादम, कुमारगौरव पुरस्कार श्रीरंग हेरंब जोगळेकर.
फोटो :
रत्नागिरीत अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण सोमवारी करण्यात आले. त्याप्रसंगी पुरस्कार विजेत्यांसह मान्यवर.