( कोलकाता )
सलग ४ पराभवानंतर पाकिस्तानने विश्वचषकात विजय मिळविला असून पाक संघाने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानच्या फलंदाजांनी ३२.३ षटकांत ३ गडी गमावून २०५ धावांचे लक्ष्य पार केले. सलामीवीर फखर जमानने ८१ धावांची तर अब्दुल्ला शफीकने ६८ धावांची खेळी खेळली. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली.
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 31व्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवून पाकिस्तानने स्पर्धेतील आपले आव्हानही कायम राखले आहे. त्यांनी कोलकात्यात बांगलादेशी संघाचा दारूण पराभव केला. या पराभवानंतर बांगलादेशी संघ विश्वचषकातून बाहेर पडला. स्पर्धेतून बाहेर पडणारा तो पहिला संघ ठरला. त्याचे सात सामन्यांत केवळ दोन गुण आहेत. उर्वरित दोन सामने जिंकूनही त्याचे केवळ सहा गुण होतील.
दुसरीकडे, पाकिस्तानचे आता सात सामन्यांत सहा गुण झाले आहेत. या विजयासह पाकिस्तान संघाने गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा संघ 45.1 षटकात 204 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात फखर झमान, अब्दुल्ला शफिक यांची वादळी फलंदाजी व महंमद रिझवान आणि इफ्तेखार अहमद यांची उपयुक्त खेळी तसेच शाहीन शाह आफ्रिदीची भेदक गोलंदाजी यांच्या जोरावर पाकिस्तानने 32.3 षटकात 3 विकेट गमावत 205 धावा करत बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला.
बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या 205 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या अब्दुल्ला शफिक व फखर झमान या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. या जोडीने संघाचे अर्धशतक फलकावर लावले. त्यांनी 18 व्या षटकांत संघाला शतकी पल्ला पार करुन दिला. यावेळी शफिकने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. पाठोपाठ झमाननेही षटकार फटकावत अर्धशतक पूर्ण केले.
शफिक 68 धावांवर बाद झाला व ही 128 धावांची भागीदारी संपूष्टात आली. त्याने या खेळीत 69 चेंडूत 9 चौकार व 2 षटकार मारले. कर्णधार बाबर आझम पुन्हा अपयशी ठरला. फखरने संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. शतकाकडे कूच करत असलेला फखर 81 धावांवर बाद झाला. त्याने 74 चेंडूत 3 चौकार व 7 षटकार फटकावले. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर महंमद रिझवान नाबाद 26 व इफ्तेखार अहमदने नाबाद 17 धावा करत संघाचा विजय साकार केला. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने 3 गडी बाद केले.
तत्पूर्वी, बांगलादेशचा कर्णधार शकिबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महमदुल्ला रियाधचे अर्धशतक व लिटन दास, कर्णधार शकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशने पाकिस्तानसमोर विजयासाठी 205 धावांचे माफक आव्हान ठेवले.
पाकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रीदीने सलामीवीर तंजीद हसन व नजमुल शांतो यांना पाठोपाठ बाद केले. दुसरीकडून हॅरिस रौफने मुश्फिकुर रहीमला बाद करत त्यांची अवस्था एकवेळ 3 बाद 23 अशी बिकट केली होती. मात्र, लिटनने महमदुल्लासह डाव सावरताना संघाचे अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने सावध फलंदाजी करताना एकेरी दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. या जोडीने संघाचे शतकही साकार केले मात्र, त्याचवेळी अर्धशतकाच्या जवळ आलेला लिटन 45 धावांवर परतला. या खेळीत त्याने 64 चेंडूत 6 चौकार मारले.
महमदुल्लाने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात तो 56 धावांवर बाद झाला. त्याने 70 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावला. तो परतल्यावर आलेल्या तौहीद हिरदोयने निराशा केली. मात्र, एका बाजूने कर्णधार शकिब जबाबदारीने फलंदाजी करत होता. त्याने मेहदीसह पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला.
शकिबही अर्धशतकाच्या जवळ आलेला असताना 43 धावांवर बाद झाला. त्याने 64 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार फटकावले. मेहदीने तळातील फलंदाजांना हाताशी घेत संघाचे द्विशतक फलकावर लावले. भक्कम फलंदाजी करत 25 धावांची खेळी करणारा मेहदीही अनावश्यक फटका मारून बाद झाला. त्याने या खेळीत 30 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावला. त्याला बाद केलेल्या महमद वासीम ज्युनिअरने तस्किन अहमद व मुस्तफिजूर रेहमानला बाद केले व बांगलादेशचा डाव 46 व्या षटकांत 204 धावांवर रोखला.