(संगलट / वार्ताहर)
समग्र चतुरंगचं ( चतुरंग प्रतिष्ठान ) पन्नासावं आणि चतुरंग प्रतिष्ठानच्या चिपळूण केंद्राचं पंचविसावं वर्ष हा समसमा संयोग साधत चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित केलेला रुपेरी-सोनेरी रंगसोहळा सोमवार, दिनांक 25 डिसेंबर रोजी दिमाखात पार पडला. डिसेंबर महिना हा चतुरंगच्या रंगसंमेलनाचा आणि जीवनगौरव पुरस्काराचा महिना. पण रुपेरी-सोनेरी वर्षांचा योग पुन्हा साधता येणार नाही असा विचार करून चतुरंगने रंगसंमेलन लांबणीवर टाकत चिपळूणमध्येच भव्य रंगसोहळ्याचं आयोजन केलं.
कृष्णा साळुंके यांचं पाच सहकारी वादकांच्या सहाय्यानं पार पडलेलं वादनानंद देणारं पखवाज वादनातील ‘ शिवतांडव ‘, श्रवणानंद देणारं आनंदगंधर्व आनंद भाटे यांचं ‘ आनंदरंग ‘ हे बालगंधर्व गीते, ठुमरी, नाट्यसंगीत व भजन गायन, नेत्रसुख आणि नृत्यानंद देणारी सोनिया परचुरे आणि संपदा जोगळेकर कुळकर्णी यांनी 18 कलाकारांसोबत सादर केलेली ‘ भगवती ‘ ही देवीस्तुती, आणि पं. रोणू मुजुमदार यांच्या बासरीच्या सुरांना दमदार साथ देणारं पं. भवानी शंकर यांचं पखवाज वादन आणि पं. अरविंद आझाद यांचं तबलावादन यातून झंकारलेला ‘ त्रिनाद ‘ यानं रंगसोहळा संस्मरणीय झाला नसता तरच नवल होतं..
या रंगसोहळ्याचं उदघाटन पार पडलं ते पंचवीस नामवंत चिपळूणकरांच्या हस्ते. भर सभागहातून या सर्वांनी वाजतगाजत मिरवणुकीने केलेला प्रवेश, प्रत्येकानं केलेलं नटराजपूजन, चिखलगावच्या रेणू दांडेकर यांनी स्वागताध्यक्ष या नात्यानं व्यक्त केलेलं मनोगत, चिपळूणच्या लोकमान्य टिळक ग्रंथालयाचे प्रकाश देशपांडे यांनी उदघाटक या नात्यानं समस्त चिपळूणकरांच्या वतीनं व्यक्त केलेलं मनोगत आणि सुधीर जोगळेकर यांनी चतुरंग दैनंदिनीचं उलगडून दाखवलेलं अंतरंग याचा आनंद चिपळूणकरांनी सकाळच्या सत्रात घेतला. याचवेळी दैनंदिनीचे मुख्य प्रायोजक जाई काजळचे राजेश गाडगीळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पण रंगसोहळ्याचा कळसाध्याय ठरला तो सायंकाळच्या सत्रातला ‘ कृतज्ञता सोहळा ‘..
चतुरंगचे संस्थापक आणि ज्येष्ठ रंगकर्मी विद्याधर निमकर यांच्या भावपूर्ण शब्दात न्हाऊन निघालेला हा सोहळा अवर्णनीय असाच होता. चतुरंगचं चिपळूण केंद्र सुरू झालं 1998 साली, पण तत्पूर्वीची वीस-पंचवीस वर्षं चतुरंगचं शैक्षणिक कार्य चालायचं ते मुंबईहून येऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बळावर.. त्या काळात, चतुरंगचं आजच्यासारखं नाव झालं नव्हतं, तेव्हा जी मंडळी कष्टपूर्वक सहाय्य करत चतुरंगमागे उभी राहिली, अशा आठ महनीयांचे प्रातिनिधिक सत्कार याप्रसंगी पार पडले. त्यात माजी आमदार आणि दै. सागरचे संस्थापक संपादक कै. निशिकांत तथा नाना जोशी यांचे चिरंजीव राजूभय्या, माजी आमदार डाॅ. श्रीधर तथा तात्यासाहेब नातू यांचे चिरंजीव डाॅ. विनय नातू, वहाळच्या शैक्षणिक प्रकल्पाची धुरा वाहणारे शिक्षकवर्य नंदकुमार काटदरे, विनायक जोशी, श्रीमती शुभांगी अभ्यंकर, काशिनाथ सुर्वे, सुचय तथा अण्णा रेडीज, डाॅ. मिलींद गोखले, आदींचा अंतर्भाव होता.
या कृतज्ञता सोहळ्याची सांगता अगदी अनपेक्षितपणे प्रशांत पटवर्धन यांनी सूत्रे हातात घेत केली. विद्याधर निमकर यांनी पंचाहत्तरीत पदार्पण केले असल्याने समस्त चिपळूणकरांच्या तसेच चतुरंग परिवाराच्या वतीने देगलुरकर सरांचे हस्ते निमकर यांचा सत्कार करण्यात आला. निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी प्रकल्पाचे आदित्य शिंदे, झारापच्या भगीरथचे डाॅ. प्रसाद देवधर आणि ऋषितुल्य डाॅ. गो. बं. देगलुरकर यांची कृतज्ञता सोहळ्याच्या सांगता समारंभात भाषणे झाली. अनेक वर्षे बंद पडलेले इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ज्यांच्या विशेष प्रयत्नाने सुरू झाले, त्या मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती रंगसोहळ्याला लाभली होती.