(मुंबई)
मुंबईतील शिवसेना भवनात शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला माजी मंत्री बबनराव घोलप हजर राहिले नाहीत. भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीला बबनराव घोलप यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यानंतर आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नाराज असलेले घोलप उद्या (रविवारी) मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिर्डीचे संपर्कप्रमुख म्हणून बबनराव घोलप यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र,काही दिवसांपूर्वी वाक्चौरे यांनी पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून घोलप आणि वाक्चौरे यांच्यात शिर्डीच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या नाशिकच्या दुष्काळी दौऱ्यावेळी घोलप यांना डावलण्यात आल्याने त्यांनी शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी बबनराव घोलप यांची भेट घेऊन हा वाद मिटविण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी मुंबईत शिवसेना भवनात शिर्डीतील स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाकचौरे यांच्या उमेदवारीला माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. घोलप यांच्यासह आम्हाला ‘उद्धव ठाकरे यांची वेळ द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली असून, घोलप समर्थक रविवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन करणार आहेत.