राज्यात महिला असुरक्षित असून त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशाच एका प्रकारात ४२ वर्षीय महिलेवर तीन नराधम आरोपींनी सामूहिक बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनवत पीडितेला तो व्हायरल करण्याची धमकीही दिली गेल्याचा प्रकार मुंबईतील कुर्ला येथे घडला आहे. यावर कळस म्हणजे या नराधमांनी बलात्कार केल्यानंतर पीडितेच्या अंगावर पेटत्या सिगारेटने चटके दिले. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पीडिता आणि आरोपी कुर्ला परिसरातच राहतात. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी सांगितले की, बलात्कारानंतर आरोपींनी महिलेच्या विविध भागावर सिगारेटचे चटके दिले. आरोपीमधील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ बनवला असून याची पोलिसात तक्रार दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी पीडितेला दिली होती.
पीडितेने ही घटना शेजाऱ्यांना सांगितली व त्यानंतर एका स्वंयसेवी संस्थेला याची माहिती दिली. त्यानंतर एनजीओमार्फत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी ३७६, ३७६ डी, ३७७ व ३२४ कलमांतर्गत गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.