(नाशिक /प्रतिनिधी)
मूल्यसंस्काराच्या माध्यमातून घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार झाल्यास देशात कर्तृत्त्ववान सदाचारी आणि संस्कारक्षम पिढी निर्माण होईल आणि त्यातून देश अधिक प्रगतीपथावर जाईल असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी केले.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठात शनिवार दि. 8 जुलै रोजी साप्ताहिक सत्संग समारोह राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या सेवेकर्यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी गुरुमाऊलींचे हितगुज झाले. गुरुमाऊली म्हणाले की, शिक्षणाला संस्काराची जोड आवश्यक आहे. मुले उच्चविद्याविभूषित झाली म्हणजे संस्कारक्षम झाली असा अर्थ होत नाही. त्याकरिता संस्कार अंत:करणावर रुजवावे लागतात. संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल हे सूत्र सेवेकर्यांनी लक्षात घ्यावे, त्याकरिता सेवेकर्यांनी मूल्यशिक्षणावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या हातून एकवेळ सेवा कमी झाली तरी चालेल मात्र प्रत्येक घराघरात श्रावणबाळ आणि पुंडलिक घडविण्यासाठी योगदान द्या असे आवाहन त्यांनी केले.
मूल्यशिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करतांना गुरुमाऊलींनी सांगितले की, आजी-आजोबांची मांडी हे नातवंडाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात बसूनच मुले संस्काराचे धडे गिरवत असतात. वीर पुरुषांच्या शौर्य कथा. प्राचीन इतिहास, अनेक संदर्भ, स्तोत्र, मंत्र आजी-आजोबांच्या मांडीवर बसूनच नातवंडे ऐकत असतात. त्यातून संस्कारक्षम पिढी घडत असते. आज अशा सुसंस्कारांचीच सर्वाधिक गरज आहे. देशात वाढत जाणार्या वृद्धाश्रमांची संख्या आपणाला कमी करायची आहे. त्याकरिता मूल्यसंस्कार गावागावात, वाड्या-वाड्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे असे गुरुमाऊलींनी नमूद केले.
18 जुलैपासून अधिक श्रावणमास सुरु होत असून घरच्या घरी श्रीमद् भागवत ग्रंथाचे वाचन केले तर भगवंत प्रसन्न होईल. बाहेर कुठेही पर्यटन करण्यापेक्षा गुरुपीठात किंवा आपापल्या घरी सेवा करावी अशी स्पष्ट सूचना गुरुमाऊलींनी केली.