(देवरुख)
दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस ‘महिला शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. कृषी विभाग संगमेश्वर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या विद्यमाने विघ्रवली येथील पालकर फार्म येथे ‘महिला शेतकरी दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी कृषी क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या तालुक्यातील महिलांचा सन्मान करण्यात आला.
ग्रामपंचायत पिरंदवणेच्या सदस्या व प्रगतीशील शेतकरी सौ. धनश्री हिरेंद्र जांभळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पावसाळी (खरीप) हंगामात भात व हळदीचे उत्पादन घेणाऱ्या सौ जांभळे, कुळीथ-पावटा यांसारखी हिवाळी (रब्बी) पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. सोबतच याच हंगामात कलिंगड, वांगी, मिरची आदी पिके उन्हाळी हंगामात घेतात. मागच्या हंगामात त्यांनी गटशेतीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले असल्याने त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा संगमेश्वर (दक्षिण) च्या नवनियुक्त तालुकाध्यक्षा व प्रथितयश लघुउद्योजिका सौ. स्नेहा फाटक, देवरुख नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष व भाजपा शहराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये, तालुका कृषी अधिकारी श्री. विनोद हेगडे, कृषी अधिकारी श्री. झांजे, पंचायत समितीचे श्री. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सौ. राधा काळे यांनी केले.