(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालगुंड शाखेच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष व मालगुंड येथील कविवर्य केशवसुत स्मारक समितीचे सदस्य राजेंद्र गोविंदराव शिंदे यांची ग्राहक सेवा समितीच्या सदस्यपदी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नाबार्ड अधिकारी यांच्या सूचनेनुसार शाखा स्तरावर ग्राहक सेवा समिती स्थापन करण्यात आली असून मालगुंड शाखेच्या समितीमध्ये राजेंद्र शिंदे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबतचे पत्र नुकतेच राजेंद्र शिंदे यांना मालगुंड येथील शाखेच्या वतीने देण्यात आले आहे. राजेंद्र शिंदे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी केली असून सर्वसामान्य जनतेशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आपल्या विविध क्षेत्रात कामगिरी करीत असताना त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी विशेष कटाक्षाने लक्ष घालून आपले काम आजतागायत सुरू ठेवले आहे. या कामाची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने त्यांची ग्राहक सेवा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या राजेंद्र शिंदे हे मालगुंड येथील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षपदी, कविवर्य केशवसुत स्मारक समितीच्या सदस्यपदी व विविध समित्यांवर कार्यरत असून मालगुंड येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी तंटामुक्त समितीचे व पर्यटन समितीचे माजी अध्यक्षपद सांभाळून आपली चोख कामगिरी बजावली होती. तसेच मालगुंड ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोनाच्या कठीण काळात ग्राम कृती दलामध्ये त्यांनी आपले उल्लेखनीय काम केले होते. या सर्व सामाजिक कामांच्या प्रेरणेने ते ग्राहक सेवा समितीच्या माध्यमातून आपले काम सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय तळमळीने करतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
त्यांची मालगुंड शाखेच्या ग्राहक सेवा समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याने मालगुंड येथील सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.