कोकणात भगतगिरी, लिंबू, मिरची, कोहळा, अशा प्रकारची देवदेवस्की मोठ्या प्रमाणात चालते. राज्यात काल रविवारी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात न्हावेली गावामध्ये चक्क देवदेवस्कीचा प्रकार उघडकीस आला. मतदान केंद्राच्या बाहेर हळदीकुंकू काजळ लावलेला कोहळा केंद्राबाहेर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
रविवारी मतदान असल्याने शनिवारी अनेक ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी घाईगडबडीत होते. मतदान प्रक्रियेची उत्सुकता शिगेला पोहचली होती. रात्री उशिरा झोपून सकाळी कार्यकर्ते मतदान केंद्राकडे दाखल झाले मात्र मतदान केंद्रावर कुणीतरी भगतगिरी केलेली दिसून आली. सकाळी मतदान केंद्रा बाहेर हळद, कुंकू, कोहळा, बुक्का, पिंजर दिसून आल्याने खळबळ उडाली. गावात सगळीकडे चर्चा रंगत होती. हा कोहळा नेमका कुणी आणि कशासाठी ठेवला असेल याबाबत उलट सुलट चर्चा रंगत होत्या. मात्र जागरूक ग्रामस्थांनी मतदान प्रक्रियेला गालबोट लागू नये म्हणून एक बैठक घेऊन सारा प्रकार मिटवण्याचा निर्णय घेतला.
अशा या देवदेवस्कीमुळे गावागावात अल्पशिक्षित, अशिक्षित लोकांच्या मनात भीतीचे आणि तणावाचे वातावरण दिसून येते.